कोलंबो, १९ जुलै २०२१: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला कालपासून सुरुवात झाली. कोलंबोत रंगलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेला ७ गड्यांनी धूळ चारत विजय मिळवला आहे. ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळविण्यात आला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
कोलंबोच्या मैदानात सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने तीन फिरकीपटूंना संधी दिली. यामध्ये बऱ्याच काळानंतर भारताची ‘कुल्चा’ अर्थात कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांची जोडी मैदानात अवतरली होती. भारतीय संघाचा तीन फिरकीपटू खेळवण्याचा प्लॅन यशस्वी झाला. कारण सामन्यात पहिले महत्त्वाचे चार फलंदाज फिरकीपटूनीच बाद केले. दरम्यान संपूर्ण सामन्याचा विचार करता चहल, कुलदीप यादव आणि दिपक चहरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर हार्दीक आणि कृणाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने नाबाद ८६ धावांची खेळी करत आपल्या नेतृत्वाची विजयी ‘गुढी’ उभारली. आर. प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार दासुन शनाका, चमिका करुणारत्ने यांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर लंकेने टीम इंडियासमोर ५० षटकात ९ बाद २६२ धावा केल्या. मात्र हे आव्हान टीम इंडियाने सहज पेलले. युवा फलंदाज पृथ्वी शॉने ४३ तर पदार्पणवीर इशान किशनने ५९ धावा करत श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.
श्रीलंकेचे गोलंदाज भारतीय फलंदाजांसमोर सपशेल अपयशी ठरल्याचे कालच्या सामन्यात पाहायला मिळाले. सलामीवीर पृथ्वी शॉ (९ चौकारांच्या सहाय्याने ४२ धावा) आणि इशान किशन (८ चौकार आणि २ षटकारांसह ५९ धावा) या दोघांनी लंकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दुसऱ्या बाजूला कर्णधार शिखर धवनने संयमी ८६ धावांची खेळी करत भारताला पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून दिला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे