पुरंदर, दि. १९ ऑक्टोबर २०२०: पुरंदर तालुक्यात काल दि. १८ रोजी झालेल्या ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी केली व संबंधित गावातील तलाठी व कृषी सेवक यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तालुक्यातील राजेवाडी, आंबळे, वाघापूर, गुरोळी या गावात काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पावसाने सुरुवात केली त्याचे अचानक रूपांतर ढगफुटीत झाले. जवळपास अडीच तास पाऊस पडला सर्व बांध, बंधारे फुटले, पिके वाहून गेली. सासवड यवत रस्ता तसेच उरुळी कांचन जेजुरी रस्ताही बंद झाला होता.
अजूनही या दोन्हीही रस्त्यावरून पाणी सुरू आहे. शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असून नुकसानीबाबत तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी गुरोळी, वाघापूर, राजेवाडी, आंबळे परिसरात जाऊन पाहणी केली यावेळी सहायक कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांनी सर्व पंचनामे तातडीने करण्याबाबत तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी सूचना दिल्या आहेत.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीकांत राऊत, राजेंद्र शिंदे, वाघापुरचे पोलीस पाटील विजय कुंजीर, चांगदेव कुंजीर, माउली कुंजीर, मधुकर जगताप, तेजस ताकवले यांच्यासह मंडल अधीकारी भारत, मंडल कृषी अधिकारी गणपत वाघमारे, कृषी पर्यवेक्षक दयानंद बनसोडे, भिसे, ग्रामसेविका सुरेखा चौधर, तलाठी विश्वास आटोळे, मनीषा भोंगळे, कृषी सहायक किरण हरपळे यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: