बिहार, ८ ऑक्टोंबर २०२०: सुशांतच्या मृत्यू प्रकरणावरून देशभरात मोठ्याप्रमाणावर राजकारण करण्यात आलं. अनेक जण यामुळं प्रसिद्धीच्या झोतात देखील आले. दरम्यानच्या काळात नटी कंगना रनौत आणि बिहारचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे चांगलेच चर्चेत आले होते. दोघांच्या बाबतीत राजकीय वर्तुळात देखील चर्चा उठू लागल्या होत्या. राजकारणात प्रवेश करण्याबाबत देखील दोघांविषयी चर्चा चालू होत्या. त्यात बिहार निवडणुकीच्या तोंडावर गुप्तेश्वर पांडे यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जेडीयूमध्ये प्रवेश केला होता.
परंतु, त्यांचं हे स्वप्न भंगलेलं दिसतंय. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारच्या पोलिस महासंचालकपदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांना मोठा धक्का बसलाय. जेडीयूनं आपली ११५ जणांची उमेदवार यादी प्रसिद्ध केलीय. यामध्ये गुप्तेश्वर पांडे यांचं नाव नाही. त्यामुळं आता गुप्तेश्वर पांडे यांची स्थिती ‘तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं धोपाटणं’ अशी झालीय.
सुशांत सिंग प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर ठाकरे सरकारवर गुप्तेश्वर पांडे यांनी भरपूर टीका केली होती. महाराष्ट्र सरकारवर टीका केल्यामुळं ते राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आले होते. गुप्तेश्वर पांडे राजकारणात उतरणार आहेत अशी अटकळ सुद्धा सुरू झाली होती. मात्र, गुप्तेश्वर पांडे यांनी या अटकळीला अनेक वेळा नाकारलं देखील होतं. परंतु, जेडीयूमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. पण, विधानसभा निवडणूक लढवण्याचं त्यांचं स्वप्न आता भंगलं आहे.
विशेष म्हणजे त्यांच्या निवृत्तीला केवळ पाच महिने शिल्लक राहिले होते. फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांची निवृत्ती होणार होती. याआधीच त्यांनी मंगळवारी (२२ सप्टेंबर) रोजी सेवानिवृत्ती घेत राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावण्याचं ठरवलं होतं. पण, त्यांच्या राजकारणातील पहिल्या प्रवेशाला मोठा धक्का बसलाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे