तेलही गेलं तूपही गेलं….

निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटालाच खरी शिवसेना मानलीय. आयोगानं शुक्रवारी सायंकाळी शिंदे गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची परवानगी दिली. शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचं आयोगाच्या निदर्शनास आलं. उद्धव गटानं निवडणुका न घेता अलोकतांत्रिक पद्धतीनं आपल्या वर्तुळातील लोकांना पदाधिकारी म्हणून नेमलं.

निवडणूक आयोगाला असंही आढळून आलं की शिवसेनेच्या मूळ घटनेत गुप्तपणे अलोकतांत्रिक बदल केले गेले. ज्यामुळं पक्ष खाजगी मालमत्तेसारखा झाला. हे बदल निवडणूक आयोगानं १९९९ मध्ये नाकारले होते.

शिवसेनेची ३३४ कोटींची संपत्ती उद्धव ठाकरेंकडून जाणार..?

निवडणूक आयोगाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर शिवसेनेची सर्व मालमत्ता उद्धव ठाकरेंना गमवावी लागेल. एडीआर डेटानुसार, २०१९-२० मध्ये शिवसेनेकडं १४८.४६ कोटी रुपयांची FD आणि १८६ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. आता खरी शिवसेना म्हणून शिंदे गट खजिनदारपदाची जबाबदारी सोपवणार असून, पक्षाच्या वतीने आर्थिक व्यवहारांसाठी त्यांची स्वाक्षरी मान्य होणार आहे. महाराष्ट्रात ८२ ठिकाणी शिवसेनेची कार्यालयं आहेत.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे दादरमधील शिवसेनेची इमारतही ठाकरे कुटुंबाकडून काढून घेतील, असं मानलं जातंय, मात्र शिंदे यांनी शनिवारी रत्नागिरीत परिस्थिती स्पष्ट करत आपण तसं करणार नसल्याचं सांगितलं.

आपल्या मृत्युपत्रात बाळासाहेबांनी मुंबईतील मातोश्री या तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याला जयदेव आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याला उद्धव यांच्या नावाने, तर तळमजला शिवसेनेसाठी ठेवल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. आता मातोश्री इमारतीच्या तळमजल्याची मालकी सध्या उद्धव ठाकरेंकडं नाही.

शिंदेंची नजर शाखांवर

शिवसेना शाखा हा पक्षाचा आधार आणि कणा मानला जातो. जोपर्यंत शाखा आहेत तोपर्यंत ठाकरे कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही पुनरागमन करू शकतं. अशा स्थितीत शिंदे गट आता याकडं डोळे लावून बसल्याचं निरीक्षकांचं मत आहे. शिंदे गट टप्प्या टप्प्याने शाखाही काबीज करेल. गेल्या शुक्रवारी रत्नागिरीच्या दापोलीत स्थानिक शाखेच्या ताब्यावरुन दोन गटात हाणामारी झाली होती.

शिवसेनेकडे मुंबईत २२७ शाखा आहेत आणि मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे ५०० शाखा आहेत. त्यात एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचाही समावेश आहे. तथापि, बहुतेक शाखा शाखा प्रमुख, स्थानिक नेता आणि ट्रस्टद्वारे चालवल्या जातात. शिवसेनेची कोणतीही शाखा थेट चालत नाही. शाखाप्रमुख शिवसेनेसोबत येतील, असा विश्वास शिंदे गटाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा