कराची मध्ये मंदिराची तोडफोड, मुस्लिमांनी केला हिंदू कुटुंबाचा बचाव…

सिंध, ५ नोव्हेंबर २०२०: पाकिस्तानच्या सिंध प्रांतात कट्टरपंथीयांनी मंदिर तोडलं. ही घटना जुन्या कराचीच्या शीतल दास कंपाऊंडची आहे. जवळपास ३०० हिंदू कुटुंबं या प्राचीन मंदिरास भेट देतात. रविवारी रात्री झालेल्या घटनेच्या वेळी, परिसरातील मुस्लिम समुदायातील लोक हिंदू कुटुंबियांना वाचवण्यासाठी पुढं आले. अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्यांना त्यांनी रोखलं.

एका प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार काही विद्रोही घटक कंपाऊंडमध्ये जमले होते. त्यांच्यापैकी बर्‍याच जणांना हिंदू कुटुंबांवर हल्ले करायचे होते. पण, हा विद्रोही तत्वांचा गट प्रथम कंपाऊंडमध्ये बांधलेल्या मंदिरात पोहोचला आणि तेथे तोडफोड सुरू केली. यावेळी विद्रोही तत्वांनी तिन्ही देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली.

त्याच वेळी माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, येथील मुस्लिम कुटुंबानं अल्पसंख्याक हिंदू समुदायावरील जमावटोळीचा हल्ला रोखला होता. जर हे लोक बचावासाठी पुढं आले नसते तर गर्दीवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं.

या घटनेनंतर मंगळवारी ६० हून अधिक हिंदू कुटुंबं शहरातील इतर भागात स्थलांतरित झाली. हिंदू समाजाच्या एका व्यक्तीनं सांगितलं की त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य येथे घालवलं, परंतु अशी घटना कधीही पाहिली नाही. सिंध प्रांतात हिंदू मोठ्या संख्येने राहतात. येथील हिंदू कुटुंबं सातत्यानं मुस्लिम कट्टर वादाविषयी तक्रारी करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा