अनिल देशमुख यांच्या ५ ठिकाणांवर ईडी कडून दहा तास छापा, काय म्हणाले देशमुख?

मुंबई, २६ जून २०२१: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लादलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) दुसऱ्यांदा देशमुख यांच्या घरावर छापा घातला. नागपूर, मुंबई येथे असलेल्या देशमुख यांच्या ५ ठिकाणी ईडीच्या ६ पथकांनी १० तास शोध घेतला. यामध्ये नागपूर आणि मुंबई येथील देशमुख यांच्या घराचा समावेश आहे. यापूर्वी ईडीने २५ मे रोजी त्यांच्या घरी छापा टाकला होता. ईडीपूर्वी सीबीआयनंही त्यांच्या १२ ठिकाणी छापे टाकले होते.

माहितीनुसार ईडीची कारवाई सकाळी ६ वाजता सुरू झाली. ईडीनं देशमुख यांच्याविरूद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केलाय. ईडी प्रकरणात अनिल देशमुख व्यतिरिक्त त्यांच्या निकटवर्तीयांचीही नावं होती, ज्यांची चौकशी देखील आता वेगानं सुरू झालीय.

आयुक्त असताना परमबीर यांनी आरोप का केले नाहीत : देशमुख

ईडीच्या छाप्यानंतर अनिल देशमुख म्हणाले, “आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी माझ्यावर आरोप का केले नाहीत? जेवढ्या पोलिस अधिकाऱ्यांना एन आय ए नेअटक केली ते थेट परमबीर यांना रिपोर्ट करायचे. परमबीर यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटविण्यात आलं कारण त्यांची भूमिका संशयास्पद होती.”

कालच्या छाप्या बद्दल अनिल देशमुख म्हणाले की, ‘ईडीच्या कारवाईला मी पूर्ण सहकार्य करीत आहे आणि भविष्यातही मी असंच करत राहणार आहे. सत्य लवकरच सर्वांसमोर येईल. ‘

मुंबईत ४ ठिकाणी आणि नागपुरात १ ठिकाणी छापे

• ज्ञानेश्वरी बंगला, शासकीय निवासस्थान
• सुखदा टॉवर, वरळी येथील घर
• कुंदन शिंदे, देशमुख यांच्या पीएचं घर
• संजीव पलांडे, देशमुख यांच्या PS चं घर
• नागपूर मधील घर

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा