तेंडुलकरने आपल्या क्षेत्राच्या बाहेर वक्तव्य करताना काळजी घ्यावी: शरद पवार

मुंबई, ७ फेब्रुवरी २०२१: क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचीन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी ट्विट करून सांगितले होते की, शेतकरी आंदोलनात बाहेरील शक्तींनी हस्तक्षेप करू नये. भारतीय आपल्या देशा बाबत निर्णय घेण्यात सक्षम आहेत. तेंडुलकरच्या या विधानावर आता राजकीय उधाण येताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी तेंडुलकरला आपल्या क्षेत्राच्या बाहेर कोणत्याही विषयावर वक्तव्य करताना काळजी घ्यावी असा सल्ला दिला आहे.

शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी शेतकरी चळवळीबाबत केलेल्या निवेदनावर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी याबाबत नाव न घेता म्हटले आहे की, (आंदोलनाबद्दल) त्यांनी जे मत मांडले आहे त्यामुळे लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.   ते म्हणाले की, शेतकरी चळवळीला बदनाम करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे नेते कधी आंदोलनकर्त्यांना खलिस्तानी म्हणतात तर काहीवेळा ते त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असतात.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा म्हणाले की, “कठोर परिश्रम घेत देशाला अन्नधान्य पुरवून आत्मनिर्भर बनवणाऱ्या शेतकऱ्यांचे हे आंदोलन आहे.  शेतकर्‍यांना बदनाम करणे ही चांगली गोष्ट नाही.”  पवार कृषिमंत्री असताना लिहिलेले पत्र सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  याबद्दल स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, “होय, मी पत्र लिहिले.  या दोन-तीन गोष्टी त्या पत्रातही स्पष्टपणे लिहून ठेवल्या आहेत, कृषी संदर्भात कायद्यात सुधारणा आणणे आवश्यक आहे.  यासाठी सर्व राज्यांच्या कृषिमंत्र्यांसमवेत बैठक घेण्यात आली आणि काही कृषिमंत्र्यांची समितीही तयार करण्यात आली.  समितीचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.”

देशाचे माजी कृषिमंत्री पवार म्हणाले की, “समितीच्या अहवालानंतर प्रत्येक राज्याला पत्र लिहिले.  कारण शेती हा राज्याचा विषय आहे.  त्यासाठी दिल्लीत बसून कायदे करण्याऐवजी प्रत्येक राज्याशी बोलले पाहिजे.  म्हणूनच मी प्रत्येक राज्याला एक पत्र लिहिले ज्याबद्दल हे लोक बोलत आहेत.”  ते पुढे म्हणाले की, “जर हा कायदा असेल तर प्रत्येक राज्याला यात रस असला पाहिजे, परंतु सध्याच्या सरकारमध्ये कृषी विभागाच्या लोकांनी दिल्लीच्या हद्दीच्या भिंतीच्या आत बसून तीन कायदे केले आणि ते संसदेद्वारे मंजूर केले.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा