कोल्हापूरात तणाव, जमावावर पोलिसांचा लाठीचार्ज

कोल्हापूर, ७ जून २०२३ : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने कोल्हापूरातील हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आक्षेपार्ह स्टेटसच्या विरोधात आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले आहेत. औरंगजेबाच्या समर्थनार्थ पोस्ट आणि स्टेटस व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांना तातडीने अटक करण्याची मागणी हिंदूत्ववादी संघटनांनी केली आहे.

या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यातच या ठिकाणी पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. यानंतर जमावाकडून पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी महापालिका चौक, शिवाजी चौक या रोडवर प्रचंड धावपळ झाली आहे.

दरम्यान महापालिका चौकात जमाव आणि पोलिस आमनेसामने आल्याने परिस्थिती स्फोटक बनली. यावेळी पोलिसांच्या लाठीचार्जमुळे धावपळीत चौकात चपलांचा खच पडला आहे. या गडबडीत पत्रकारांनाही पोलिसांचा लाठीमार बसला आहे. अशा धावपळामध्ये श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनाही या घटनेचा फटका बसला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा