मुंबई,७ डिसेंबर २०२२ :सीमाभागात महाराष्ट्रातील काही वाहनांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर एसटी महामंडळाने कोल्हापूर-निपाणीमार्गे कर्नाटकात जाणाऱ्या दररोजच्या ६६० फेऱ्या रद्द केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
मंगळवारी बेळगाव-हिरेबागेवाडी येथील टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील काही वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे दोन्ही राज्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी, खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी एसटी महामंडळाला कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बसेस थांबविण्याची सूचना केली.
कोल्हापूर विभागातून कर्नाटकात दररोज २० ते २५ हजार प्रवासी प्रवास करतात. कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल, गडहिंग्लज, चंदगड, आजरा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांवतवाडी, बांदा या तालुक्यांमध्ये जाणाऱ्या एसटी कापशी-उत्तूरमार्गे वळविण्यात आल्या आहेत. तर सांगलीमधून कर्नाटकात जाणाऱ्या सुमारे ६० बस बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कर्नाटकनेही महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा स्थगित केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर