छत्रपती संभाजीनगर २९ जानेवारी २०२५ : मालेगाव येथील महामार्गावर टुणकी गावाजवळ एका दुर्दैवी अपघातात चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला. बांधकामासाठी लोखंडी सेंट्रिंग प्लेट वाहून नेणाऱ्या ट्रकमधील मजूर झोपेत असताना अचानक झालेल्या हालचालीमुळे लोखंडी प्लेट अंगावर पडल्या आणि या चौघांना आपला जीव गमवावा लागला. मृत्युमुखी पडलेले सर्व मजूर मध्य प्रदेशातील निमच जिल्ह्यातील रहिवासी असून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कर्नाटकमध्ये मजुरीसाठी गेले होते. मात्र, आपल्या गावी परतताना त्यांच्या भीषण अपघात झाला .
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाण मानसिंग गरासिया, विजय कवरलाल गरासिया, निर्मल राजूजी गरासिया आणि विक्रम मदनजी कछावा हे पाच मजूर एका ट्रकमध्ये प्रवास करत होते. हा ट्रक लोखंडी सेंट्रिंग प्लेट घेऊन मध्य प्रदेशच्या दिशेने निघाला होता. मजूर रात्रीच्या वेळी ट्रकमध्ये झोपले होते. टुणकी गावाजवळ चालकाने अचानक ब्रेक दाबताच ट्रकमधील प्लेटचा मोठा ढीग सरकत मजुरांच्या अंगावर कोसळला.आणि त्यात या चौघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात गरीब मजुरांचा बळी गेल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. खडावदा गावातील कुटुंबांनी आपल्या कुटुंबप्रमुखांना गमावले आहे. मजुरी करून कुटुंब चालवणाऱ्या या मजुरांचे प्राण एका हलगर्जीपणामुळे गेले. आहे असे स्थानिक नागरिकांकडून सांगितलं जात आहे
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला का, याची चौकशी सुरू आहे. या भीषण घटनेने परिसरात शोककाळा पसरली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे