जम्मू-काश्मीर, ५ ऑगस्ट २०२२: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. जम्मू-काश्मीरमधून राज्यघटनेतील ३७० कलम रद्द केल्याच्या वर्धापन दिनापूर्वीच दहशतवाद्यांनी येथे काम करणाऱ्या बिगर-काश्मिरी कामगारांवर हा हल्ला केला. पुलवामाच्या गदूरा भागात दहशतवाद्यांनी मजुरांवर ग्रेनेड फेकले असून या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर २ जण जखमी झाले आहेत. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, या घटनेत मृत्युमुखी पडलेला मजूर हा बिहारमध्ये राहणारा मुस्लिम आहे. जखमींना स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज, ५ ऑगस्ट, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याचा चौथा वर्धापन दिन आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम ३७० हटवले होते.
मोहम्मद मुमताज असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तो बिहारमधील साकवा परसा येथील रहिवासी होता. दोन्ही जखमी बिहारचे रहिवासी असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांचे म्हणणे आहे. मोहम्मद आरिफ आणि मोहम्मद मजबूल अशी त्यांची नावे असून दोघेही बिहारमधील रामपूर येथील आहेत. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे