बेलगोरोड, १६ ऑक्टोंबर २०२२: युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का बसला आहे. रशियन सैन्यावर भीषण गोळीबार झाला असून त्यात ११ रशियन सैनिकांचा मृत्यू झालाय. १५ हून अधिक जवान जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. रशियाने याला दहशतवादी हल्ला म्हटलंय.
२ जणांनी गोळीबाराची घटना घडवली आहे. दोघेही रशियन सैन्यात स्वयंसेवक म्हणून काम करत होते. दोन्ही बंदूकधारीही मारले गेले.
रशियन लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराची घटना युक्रेनजवळील आर्मी फायरिंग रेंजमध्ये घडली. दोन्ही हल्लेखोर हे माजी सोव्हिएत युनियनचे नागरिक असल्याचे रशियाने म्हटलंय.
चालू होता गोळीबाराचा सराव
शनिवारी दोन्ही सैनिक उर्वरित सैनिकांसोबत गोळीबाराचा सराव करत होते. यादरम्यान त्याने अचानक बाकीच्या जवानांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली. रशियन सैनिकांनी प्रत्युत्तरादाखल दोघांनाही ठार केलं.
युक्रेनला लागून असलेल्या भागातील घटना
एजन्सीनुसार, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने हल्ल्याशी संबंधित काही माहिती शेअर केली आहे. दक्षिण-पश्चिम रशियाच्या बेलगोरोड भागात गोळीबार झाल्याचे त्यांनी सांगितले. हे शहर युक्रेनच्या सीमेला लागून आहे.
राखीव सैनिकांच्या भरतीवर नाराजी
खरं तर, युक्रेनशी युद्ध करणाऱ्या रशियामध्ये नागरिकांची सैन्यात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अलीकडेच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ३ लाख राखीव सैनिक युद्धासाठी पाठवण्याची घोषणा केली. त्यानंतर युक्रेनचे ४ क्षेत्र रशियात विलीन करण्याची योजना होती. जे आता पूर्ण झाले आहे. पुतिन यांनी असा युक्तिवाद केला की लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि रशियाच्या ताब्यात असलेल्या भागात शांतता राखण्यासाठी राखीव सैन्याची जमवाजमव आवश्यक आहे.
परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात नागरिक!
राखीव सैनिकांच्या भरतीच्या पुतीन यांच्या निर्णयाला रशियात प्रचंड विरोध झाला. एकीकडं सीमेला लागून असलेल्या अनेक भागातील लोक परदेशात जात होते, तर अनेकजण गुगलवर हात मोडण्याचे सोपे मार्ग शोधू लागले होते.
या निर्णयाला तीव्र विरोध झाला
पुतिन यांच्या निर्णयाला इतका विरोध झाला की मीडिया रिपोर्ट्सनुसार, आंदोलन करणाऱ्या हजारो लोकांना अटक करण्यात आली. OVD-Info मॉनिटरिंग ग्रुपनुसार, ३८ वेगवेगळ्या शहरांमधून १,३३२ लोकांना ताब्यात घेण्यात आलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे