नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर २०२२ दिल्लीत २००० साली लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यातील दोषी मोहम्मद आरिफ ऊर्फ अशफाकची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. आज न्यायालयाने त्याची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता लवकरच आरिफला फासावर लटकवले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबर २००० रोजी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन जवानांसह अन्य तीन जण ठार झाले होते. यादरम्यान लष्कराने केलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले. या प्रकरणी अशफाकला ३१ ऑक्टोबर २००५ रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी घेतली आणि कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत १० ऑगस्ट २०११ रोजी दहशतवादी आरिफला फाशीची शिक्षा सुनावली.
लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत अकरा दोषींना शिक्षा झाली आहे. या हल्ल्यातील मुख्य आरोपी आरिफ याने २००५ पासून आपल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी अनेक वेळा पुनर्विचार याचिका दाखल केल्या आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक वेळी त्यांची याचिका फेटाळून लावली.
काय प्रकरण आहे ?
२२ डिसेंबर २००० रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यात तीन जण ठार झाले होते. या हल्ल्यात लष्कराच्या दोन जवानांसह तीन जणांचा मृत्यू झाला होता. आरिफ उर्फ अशफाक हा याच प्रकरणात पकडलेला मुख्य आरोपी आहे. तेव्हापासून तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. नंतर कोर्टाने आरिफला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. मात्र अरिफने फाशीला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा आरिफची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक