जम्मू-काश्मीर, 11 डिसेंबर 2021: जम्मू-काश्मीरमध्ये एकदा दहशतवाद्यांचे नापाक कृत्य समोर आले आहे. यावेळी दहशतवाद्यांनी पोलीस दलाला लक्ष्य केले. ज्यात दोन पोलीस शहीद झाले होते. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा येथील गुलशन चौक भागात शुक्रवारी दुपारी हा दहशतवादी हल्ला झाला.
या संदर्भात काश्मीर पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी एका वृत्त वाहिनिशी संवाद साधत या हल्ल्याला दुजोरा दिला, ते म्हणाले की या दहशतवादी घटनेत दोन पोलिसांना गोळी लागली होती.जे नंतर शहीद झाले. मोहम्मद सुलतान आणि फयाज अहमद अशी त्यांची नावे आहेत.
जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. बांदीपोरा येथे हा दहशतवादी हल्ला होताच संपूर्ण परिसराला वेढा घातला गेला. परिसरात शोध मोहीम जोरात सुरू आहे. मात्र, हा हल्ला कोणी केला, किती जणांनी दहशतवादी घटना घडवून आणली याबाबतची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही.
यापूर्वी, 8 डिसेंबर रोजी शोपियान चकमक देखील झाली होती, जेव्हा सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. त्याचवेळी, 8 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांविरोधातील कारवाईची माहितीही दिली होती.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर म्हणजेच 5 ऑगस्ट 2019 पासून आतापर्यंत 366 दहशतवादी मारले गेल्याचे सरकारने सांगितले होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यसभेत ही माहिती दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे