उदयनिधी स्टॅलिनच्या सनातन वक्तव्यावर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर

मुंबई, ७ सप्टेंबर २०२३ : तामीळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिल्या. तसेच स्टॅलिन यांच्या या वक्तव्यावरून ‘इंडिया’ आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आता यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर भूमिका स्पष्ट करताना ठाकरे गटाने आज भाजपाचाही समाचार घेतला आहे.

जगातील कोणताही धर्म निर्दोष नाही. भाजपचे हिंदुत्व जसे ढोंगी तसे ढोंग सर्वच धर्मांत आहे. सनातन धर्म गाईला देवता–माता मानतो. वीर सावरकरांना गोमातेचे थोतांड मान्य नाही. त्यानुसार उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘सनातन’वर तोडलेले तारे अज्ञानाच्या अंधारात लुप्त झाले, अशा शब्दांत ठाकरे गटाच्या मुखपत्राने सनातन धर्मावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीही स्पष्टच सांगितले, शेंडी–जानव्याचे, घंटा बडवणाऱ्यांचे हिंदुत्व आपल्याला मान्य नाही. याउलट भाजपचे बेगडी हिंदुत्व आहे. ते निवडणुकीत राम–बजरंग बली आणतात व लोकसभेत राजेशाहीचे प्रतीक म्हणून सेंगोल आणतात. हे विज्ञान नसून रूढीवाद आणि हुकूमशाही आहे, अशी टीका ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे.

उदयनिधी काय म्हणाले? “सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही, त्यांना संपवूनच टाकावे लागते. आपण डेंग्यू, डास, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. ते आपल्याला संपवायचे आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला सनातन धर्मालाही संपवायचे आहे. उदयनिधी यांचे हे विधान त्यांच्या ‘द्रविडी’ भूमिकेशी तर्कसंगत असले तरी देशातील ८०-९० कोटी हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवणारे आहे,” असं ठाकरे गटाने म्हटलं.

ठाकरे गटाने पुढे म्हटलं, “भारतीय जनता पक्ष व त्यांच्या बगलबच्च्यांना तर उदयनिधींच्या वक्तव्याने उकळ्याच फुटल्या. उदयनिधींना उत्तर त्याच भाषेत द्यायला हवे. ते देण्याचे सोडून ‘इंडिया’ आघाडी आता उदयनिधींवर काय भूमिका घेणार? शिवसेनेचे यावर काय धोरण आहे? वगैरे प्रश्न विचारले गेले. शिवसेनेची भूमिका ही जुनीजाणती म्हणजे ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हीच आहे व राहणार. ममता बॅनर्जीपासून केजरीवाल, काँग्रेस वगैरे लोकांनीही उदयनिधींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. दोष तर सर्वच धर्मांमध्ये आहेत, पण हिंदू धर्माने हे दोष दूर करण्यासाठी सतत प्रयत्न केले. सतीची चाल, अस्पृश्यता, विषमता, स्त्री शिक्षण अशा अनेक विषयांवर हिंदू धर्माने प्रगतशील भूमिका घेतलीय.

डॉ.आंबेडकरांनी त्यांच्या लाखो बांधवांसह हिंदू धर्माचा त्याग केला. धर्मातील स्पृश्य अस्पृश्यता आणि रूढी-परंपरेच्या विरोधात त्यांनी बंड केले. या बंडापासून सनातन धर्माने धडा घेतला आणि सामाजिक न्यायाचे तत्त्व स्वीकारले. धर्म जागच्या जागीच आहे, पण अस्पृश्यता, रूढी-परंपरांना मलेरिया, डेंग्यूप्रमाणे आपण खतम केले. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माचा हा इतिहास समजून घेतला पाहिजे, असं ठाकरे गटाने सांगितल आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा