लोकसभेच्या जिंकलेल्या सर्व १८ जागा ठाकरे गट लढवणार आणि जिंकणार – संजय राऊत

मुंबई,दि, १९ मे २०२३ : आगामी लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाचे १९ खासदार लोकसभेत दिसतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राज्यात ठाकरे गटाने जिंकलेल्या सर्व १८ जागा लढवणार असून इतर काही जागांवरही दावा करणार असल्याचे संजय राऊत म्हणाले असून, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा कोणताही फॉर्मुला (१६,१६,१६) ठरला नसल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडी आहे आणि राहील.
महाविकास आघाडीत निवडणुकीचा कोणताही फार्मूला अजून ठरलेला नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. तसेच २०१९ मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेने जिंकलेल्या १८ जागा आमच्याकडे राहणार आहेत. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचा विजय होईल आणि पुढील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातील १८ आणि दादरा नगर हवेलीतील एक असे सर्व १९ उमेदवार निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोपट मेलाय, हे कोणीतरी उद्धवजींना सांगायला पाहिजे या केलेल्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेऊन दाखवा पोपट कोणाचा मेल आहे ते कळेल.बेकायदेशीर सरकारचा पोपट मेला आहे. या सरकारला बेकायदेशीरपणे ऑक्सिजन दिले जात आहे. असेही राऊत म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा