ठाणे, 3 फेब्रुवारी 2022: राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांनी समीर वानखेडे यांच्या बार परवाण्या विषयी प्रश्न उपस्थित केले होते. तसेच या प्रकरणावरून त्यांच्यावर आरोपही केले होते. नवी मुंबई येथील वाशी एपीएमसी मार्केट परिसरात समीर वानखेडे यांचा सद्गुरू फॅमिली रेस्टॉरंट आणि बार आहे. वानखेडे यांनी सज्ञान नसताना म्हणजेच अवघ्या सतराव्या वर्षी त्यांच्या नावाने मद्यालयाचा परवाना काढला होता, ही बाब चौकशीत समोर आल्याने मद्यालयाचा (बार) परवाना ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी कायमस्वरुपी रद्द केला.
सज्ञान नसताना मद्यालयाचा परवाना वानखेडे यांनी काढल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. समीर वानखेडे यांनी 1997 मध्ये बारचा परवाना मिळवला होता. मात्र, त्यावेळी समीर वानखेडे यांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी होते. परंतु, समीर वानखेडे यांनी खोटी माहिती देऊन बारचा परवाना मिळवला होता. ही माहिती उघड झाल्यानंतर ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून समीर वानखेडे यांच्या बारचा परवानाच रद्द करण्यात आला आहे. या बारमधील साहित्य जप्त करत जिल्हा प्रशासनाने बारला टाळं ठोकलंय.
उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण देण्यास सांगितलं होतं. 14 डिसेंबर 2021 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांना नोटीस बजावली होती. याबाबत त्यांनी वकीलामार्फत स्पष्टीकरण दिलं होतं. परंतु पुरेशी कागदपत्रं सादर करण्यात आलेली नव्हती. त्यामुळं ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी याप्रकरणाची सुनावणी घेतली होती. त्यावेळेस त्यांनी मद्यालयाच्या परवान्या संदर्भातील वयाच्या अटीच्या कागदपत्रांची पुर्तता करण्यास सांगितलं होतं. परंतु, वानखेडे यांना ती कागदपत्रं सादर करता आली नाही.
नवाब मलिकांच्या पाठपुराव्याला यश
समीर वानखेडे यांना एनसीबीच्या विभागीय संचालकपदावरुन हटवल्यानंतरही आपण त्यांच्याविरुद्धचा लढा सुरुच ठेवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं होतं. त्यावेळी नवाब मलिका यांनी समीर वानखेडे यांनी अवैधरित्या मिळवलेल्या बार आणि परमीट रुमचा परवान्याविषयी भाष्य केलं होतं. अल्पवयीन असताना समीर वानखेडे यांनी बार परमीट रुमचं लायसन्स घेतलं होतं. यूपीएससीत नोकरीत असताना स्वत:चा बार सुरु केल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. त्यामुळं आता ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वानखेडे यांच्या बारचा परवाना रद्द केल्याने नवाब मलिकांनी आपला शब्द खरा करुन दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे