ठाणे, १५ सप्टेंबर २०२३ : ठेकेदारांकडून तुटपुंजे वेतन दिले जात असून, वारंवार केवळ आश्वासनच मिळत असल्याने ठाणे परिवहनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून संपाचे हत्यार उपसले आहे. ठाणे परिवहनच्या घोडबंदर येथील आनंदनगर आगारात ३६० पुरुष आणि महिला वाहकांनी संप सुरू करत ठिय्या मांडला आहे. त्यामुळे सकाळपासून परिवहनच्या शंभर फेऱ्या रद्द झाल्या आहेत.
ठाणे परिवहनच्या आनंदनगर आगारात कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. यामध्ये २३५ पुरुष व १२५ महिला वाहक संपावर गेल्याने सकाळपासून परिवहनच्या शंभर फेऱ्या रद्द झाल्या. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. घोडबंदर, मुलुंड, कोपरी, बोरिवली या मार्गावर धावणाऱ्या परिवहन सेवेवर संपाचा परिणाम झाला आहे.
ठेकेदारांकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनाच्या मुद्द्यावरुन परिवहन कर्मचारी आक्रमक झाले आहेत. संपकरी कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यासाठी प्रशासन आनंदनगर आगारात दाखल झाले असून, मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असा कामगारांनी इशारा दिला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर