कोरोनाग्रस्त रुगणाच्या घराच्या आसपासचा ३ किमीचा भाग बंदिस्त

इंदापूर, दि.२९ एप्रिल २०२०: भिगवण येथील एका ज्येष्ठ महिलेला मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालावारुन स्पष्ट झाल्याने सदर रुगणाच्या घराच्या आसपासचा ३ किमीचा परिसर प्रशासनाच्यावतीने बंदिस्त करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. त्याचप्रमाणे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे शहर व जिल्ह्याच्या आसपासच्या भागात कोरोनाने धुमाकूळ घातला असतानाच इंदापूर मध्ये एकही रुग्ण नसल्याने इंदापूर तालुका सेफ झोन समजला जात होता मात्र इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरामध्ये एक रुग्ण आढळल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .

भिगवण स्टेशनमधील एका महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने परिसरातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याची कार्यवाही आरोग्य विभागाच्यावतीने त्वरीत चालू करण्यात आली आहे. तो परिसर नव्याने निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करून त्यांना चौदा दिवस होमकोरंटाईन करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विलगीकरण कक्षात देखील टाकले जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. सबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची यादी करण्याचे काम उशीरा पर्यंत चालू होते.

भिगवण स्टेशन हे केंद्र धरून तीन किमी अंतर परिसरात कंटोनमेंट झोन म्हणून तर तेच केंद्र धरून पाच किमी अंतराचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. सर्व प्रकारची वाहतूक नियंत्रीत करण्यात येणार असून अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. कंटोनमेंट झोनमधील रस्त्यावरील वाहनांची कसून चौकशी केल्यानंतर सोडण्यात येईल असे पोलिस प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

शेजारील बारामती तालुक्यात कोरोना रुग्ण आढळला, मात्र इंदापूर तालुक्यात
कोरोनाचा रुग्ण नसल्याने दिलासा होता. गेल्या दोन आठवड्यापासून बारामती शहरात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नसल्याने बारामती कोरोना मुक्त होण्याच्या मार्गावर असतानाच आज इंदापूरमध्ये मध्ये कोरोना खाते उघडल्याने आता पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

“भिगवणकरांनो बाहेर पडू नका स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या”- दत्तात्रय भरणे                                          इंदापूर तालुक्यातील भिगवण स्टेशनजवळ कोरोनाचा रुग्ण आढळल्याचे समजताच बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी तात्काळ भिगवणला भेट देत सदर प्रकार अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतला यावेळी त्यांनी नागरिकांना प्रशासनाच्या सर्व सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. भिगवणकरांनो घाबरून जावू नका पण स्वत: ची आपल्या कुटुंबाची काळजी घ्या , असे आवाहन करत शासन सर्वोतपरी उपाय करत असून त्याला साथ द्यावी असे आवाहन केले.

भिगवण स्टेशन येथे कोरोनाची लागण झाल्याचे समजताच बारामतीचे प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी, पोलिस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, डॉ. राजेश मोरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, सहायक पोलिस निरिक्षक जीवन माने यांच्या पथकाने भिगवण स्टेशन परिसरास भेट देवून सबंधित रुग्णाच्या परिसरातील माहिती घेतली. यावेळी भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित उदावंत, जि. प. सदस्य हनुमंत बंडगर, सचिन बोगावतधनाजी थोरात, लाला धवडे, पराग जाधव, महेश शेंडगे, जयदीप जाधव, प्रदिप वाकसे, संतोष धवडे, मंडल अधिकारी मकरंद तांबडे, ग्रामविकास अधिकारी भीमराव भागवत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा