पाकिस्तान- इस्लामाबाद: ८ सप्टेंबर २०२२: पाकिस्तानात पुरामुळे सुमारे ४५०० वर्षे एवढ्या प्राचीन मोहंजोदडो या जागतिक वारसास्थळावर संकट ओढवले आहे. सिंध प्रांतातील मोहंजोदडोमध्येदेखील जोरदार पाऊस झाला. या मुसळधार पावसाचा मारा भिंती सोसू शकल्या नाहीत. मुसळधार पावसामुळे वारसास्थळाच्या भिंती कोसळल्या आहेत.
सिंधू संस्कृतीमधील ४५०० वर्षांपूर्वीचे हे शहर आहे. १९२२ मध्ये हे शहर सापडले होते. ते सध्या पाकिस्तानातील सिंधमध्ये आहे. चांगल्या नगररचनेचा प्राचीन नमुना असलेले मोहंजोदडो युनेस्कोच्या वारसास्थळ यादीत आहे. साडेचार हजार वर्षांपूर्वीचे हे शहर कसे नष्ट झाले हे एक रहस्य आहे.
मोहंजोदडोचे संरक्षक अहसान अब्बासी म्हणाले, मोहंजोदडोच्या नगरातील नाल्यांमधून पावसाचे पाणी वाहून गेले. परंतु मुसळधार पावसामुळे भिंतींचा पाया डगमगू लागला आहे. त्याची दुरुस्ती केल्यास या क्षेत्रातील प्राचीनता संपुष्टात येईल अशीही शक्यता आहे. इतिहासकारांनी अशा प्रकारच्या डागडुजीला विरोध दर्शवला आहे.
पाकिस्तानात पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १ हजार ३४३ झाली आहे. सव्वातीन कोटी लोकांना पुराचा फटका बसला आहे. आगामी ४८ तासांत सिंध व बलुचिस्तानला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे