प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका

दौंड, दि. १८ जून २०२० : दौंड तालुक्यातून जाणाऱ्या मनमाड बेंगरूळ या महामार्गाचे काम कुरकुंभ ते गुंजखिळा दरम्यान सुमारे दोन वर्षापासुन चुकीच्या पद्धतीने झालेले जमीन अधिग्रहण, बदललेल्या गट नंबर, शेतकऱ्यांना व इतर जमीन मालकांना न मिळणारी भरपाई यामध्ये सहभागी असलेल्या शासकीय यंत्रणेजवळ शेतकऱ्यांना न देता येणारी उत्तरे अशा अनेक कारणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे बंद पडलेले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका या रस्त्याला बसला असुन आजवर जवळपास दहा किलोमीटर अंतरातील रस्ता पूर्णपणे उखडून ठेवल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयाच्या निर्णयानुसार मनमाड ते बेंगरूळ या राज्य मार्गाचे रुपांतर महामार्गात करण्यात आले होते. त्यानुसार या परिसरात जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली. मात्र यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्यात येणार आहे त्यांना मोबदला मिळण्यासाठी शासनाचे उंबरे झिजवण्याची वेळ बाधीत शेतकऱ्यांवर आली आहे.

मोजणीच्या प्रक्रियेत कुठलीही सुसूत्रता दिसुन येत नसल्याचे आजवर शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नोटिसांमधून दिसून येत आहे. दौंड तालुक्यात रस्ता करताना रस्त्याची बदलेली रूंदीच यामध्ये सुरु असलेल्या आर्थीक गोंधळाची साक्ष देत आहे. दौंड तालुक्यातील लोकप्रतिनिधीच्या माध्यमातुन जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार बैठका घेण्यात आल्या आहेत मात्र यामधुन काहीच मार्ग काढला जात नाही त्यामुळे या सर्व कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

या रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे जिरेगाववरून जाणाऱ्या बारामती रस्त्याची अवस्था गेली दोन वर्ष आदिवासी भागातील रस्त्याच्या पलीकडे झाली आहे. त्यामुळे बहुतांश वाहनांनी पर्यायी रोटी घाटाच्या रस्त्याचा वापर सुरु केला त्यामुळे मध्यंतरी असणाऱ्या गावांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील विकासाला चालना देण्यासाठी या रस्त्याची गरज असुन हा रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळणार का याबाबत कुठल्याही यंत्रणेकडे उत्तर नसल्याचे दिसत आहे.

दरम्यान या रस्त्याच्या कामाला सुरवात करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी मदत करावी. न्यायालयाच्या माध्यमातुन या रस्त्यामध्ये अधिग्रहण होणाऱ्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करावा विनाकारण कामाच्या मध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात केला जाईल असे आवाहन दौंड पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा