मुंबई १६ जून २०२३: येत्या आठवड्यात ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करू व दोन टप्प्यांतील एफआरपीचा कायदा मागे घेऊन एफआरपी एक टप्प्यात देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हि ग्वाही दिली.
शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी जाब विचारु, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. यावर मंत्रालयात बैठक बोलावली होती. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी, शेतकऱ्यांच्या संबंधीत प्रलंबित निर्णय तातडीने घ्या अशी आग्रही मागणी केली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान थकीत असल्याबाबतच्या प्रश्नांवर बोलताना, मुख्यमंत्र्यांनी अनुदानाची रक्कम तातडीने देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे, त्या शेतकऱ्यांचे व्याज माफ करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, कामगार मंत्री सुरेश खाडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जालधंर पाटील, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर