ठाण्यात फेरिवाल्याने सहाय्यक आयुक्ताची बोटे कापली, अंगरक्षक ही जखमी

ठाणे, ३१ ऑगस्ट २०२१:  काही वर्षापासून अनाधिकृत फेरिवाल्यांचा विषय मुंबई, ठाणे परिसरात प्रामुख्याने पुढे येत आहे. पुन्हा एकदा धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. महापालिकेच्या माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने भीषण हल्ला केला आहे. कल्पिता पिंपळे या काल कासारवडवली भागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत होत्या, याच दरम्यान एका फेरीवाल्याने त्यांच्यावर धारधार शस्त्राने हा जीवघेणा हल्ला केला आणि यामध्ये त्यांची तीन बोटं तुटली असून डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे. तर हल्ल्यादरम्यान पिंपळे यांच्या संरक्षणासाठी धावलेल्या त्यांच्या सुरक्षारक्षकाचेही एक बोट तुटले आहे.
या धक्कादायक घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी फेरीवाल्याला ताब्यात घेतले आहे. अमरजित यादव असे आरोपी फेरीवाल्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी सांयकाळी ६.३० च्या सुमारास घडली. सध्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सुरूवातीला ठाण्यामधील वेदांता रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांना पुढील उपचारांसाठी ज्युपिटर रूग्णालयात हलवण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे.
काय आहे घटना
स्थानिकांच्या माहितीनुसार पालिकेची कारवाई सुरू असताना या माथेफिरू फेरीवाल्याची गाडी कारवाई करण्यास गेलेल्या पथकाने जप्त केली होती. त्याचाच राग मनात धरून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या फेरीवाल्यने त्यांच्या डोक्यावर चाकुने मारायचा प्रयत्न केला, त्याच वेळी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवल्याने त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली आणि तुटून खाली पडली. हल्ला झाल्याचे समजताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी या माथेफिरू फेरीवाल्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने स्वतःच्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. हे थरारनाट्य भर रस्त्यात काही वेळ सुरू होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा