अकोला येथे प्रवासादरम्यान बदली झालेली बॅग प्रवाशाला केली परत

6

अकोला, २५ जानेवारी २०२४ : अकोला रेल्वे स्टेशनवर काल दुपारी दोन वाजता अहमदाबाद हावडा एक्सप्रेस आली असताना त्यातील एका प्रवाशाने चुकून दुसऱ्याच प्रवाशाची बॅग स्टेशनवर उतरवली. त्यामध्ये २ लाख १७ हजार ५०० रूपयांची रोख रक्कम व ७० हजार रूपयांचे साहित्य मिळून आले आहे. सदर बॅग अकोला लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने त्या प्रवाशाला परत देण्यात आली आहे.

अकोल्यातील दिपक पोपट हे काल त्यांच्या इतर १६ जणांच्या कुटुंबियांसह प्लॅटफॉर्मवर उतरले. त्यांच्या साहित्यासह दुसऱ्या एका प्रवाशाची ट्रॉली बॅग नजरचुकीने उतरवली गेली. त्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी ती ट्रॉली बॅग अकोला लोहमार्ग पोलिस स्टेशन येथे जमा केली. पोलीसांनी बॅग तपासली असता, त्यामध्ये २ लाख १७ हजार ५०० रूपये रोख रक्कम व इतर ७० हजार रूपयांचे साहित्य मिळून आले. पोलिसांनी तातडीने बॅगच्या मालकाचा शोध घेण्यासाठी रायपूर येथे रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून अहमदाबाद हावड़ा एक्सप्रेस अटेन्ड करण्यास सांगितले. रायपूर रेल्वे पोलीसांनी ट्रेनमध्ये शोध घेतला असता बी. चार कोचमध्ये असलेले प्रवाशी जतीन भरत पटेल, रा. संभलपूर, ओडीशा यांची ती बॅग असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी सदर प्रवाशी यांना संपर्क करून परत बोलावून घेतले.

२४ जानेवारी रोजी बॅग, रोख रक्कम व इतर साहित्य कायदेशीर प्रक्रिया करून प्रवाशी जतीन पटेल यांना परत केली. त्यावेळी सदर प्रवाशी जतिन पटेल यांनी रेल्वे पोलीसांची मेहनत व दिपक पोपट यांचा प्रामाणिकपणा लक्षात घेता त्यांचे आभार मानले. त्यांची बहीण कॅनडा येथून सहा वर्षानंतर भारतात परत आली होती. बॅग गहाळ झाल्याने ती हाताश झाली व पुन्हा बॅग सापडणार नाही, असे त्यांना वाटत होते. परंतु अकोला लोहमार्ग पोलिसांनी त्यांना संपर्क करून त्यांची बॅग, रोख रक्कम व बॅगमधील साहित्यांची त्यांना माहिती दिली. यावेळी अकोला लोहमार्ग पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक अर्चना गाढवे यांनी कायदेशीर मार्गदर्शन व सहकार्य केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : शाहिद इकबाल

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा