युक्रांदच्या लढ्यामुळं ५ ते ६ हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न लागणार मार्गी…

पुणे, ८ डिसेंबर २०२०: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत शिकत असलेले अनेक विद्यार्थी निकालाबाबतच्या समस्यांना सामोरे जात आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी आपण व्हर्चुअल आणि फिजिकली अशा दोन्ही पद्धतीनं ‘युक्रांद’च्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठानंही सकारात्मक उत्तरं देऊन काही विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले. मात्र, अनेकांचे प्रश्न प्रलंबित आहेत.

विद्यार्थ्यांशी केलेल्या चर्चेतून आपण आंदोलन करण्याचं ठरवले.
त्यानुसार काल अहमदनगर, नाशिक, पुणे आणि इतर ठिकाणाहून बरेच विद्यार्थी आंदोलनासाठी पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर उपस्थित राहिले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपापल्या अडचणी बोलून दाखवल्या. युवक क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये सातत्यानं विद्यापीठाशी संपर्क साधण्याचे काम पुणे जिल्हा युक्रांदचे उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी केलं. तसेच अध्यक्ष सचिन पांडुळे यांनी कालच्या आंदोलनाची हाक दिली.

यावेळी संघटनेचे कार्यवाह संदीप बर्वे, राज्यसंघटक जांबुवंत मनोहर, सहकार्यवाह अप्पा अनारसे, रवी लाटे, नीलम पंडित उपस्थित होते. ठोस निर्णयाचे परिपत्रक घेऊनच इथून जाणार असा निर्णय युक्रांद आणि विद्यार्थ्यांनी घेतला. त्यानुसार सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत विद्यापीठ परिसरात आंदोलकांनी ठिय्या दिला. आंदोलनादरम्यान कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आणि परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

• विद्यापीठ प्रशासनानं मान्य केलेल्या मागण्या:

विद्यार्थ्यांच्या सर्व तक्रारी सोडवून देण्यासाठी कुलगुरू सकारात्मक आहेत. त्यांनी काल केलेल्या ठिय्या आंदोलनाची दखल घेऊन युवक क्रांती दलाच्या शिष्टमंडळाला सर्व तक्रारींवर कार्यवाही करणार असल्याचं सांगितलं.

निर्णयाची घोषणा –

१) काल आंदोलनात सहभागी असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या लेखी तक्रारी तत्काळ सोडवणार

२) देशाच्या कानाकोपऱ्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी जे काल आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकले नाही पण त्यांना अडचणी आहेत. अशांना विद्यापीठाकडून तीन दिवसांसाठी ७ ते ९ डिसेंबर कालावधीत एक ईमेल आयडी दिला जाणार आहे. त्या ईमेलवर ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांनी पाठवण्याचे विद्यापीठ प्रशासनानं अवाहन केलं आहे.
ईमेल आयडी – osd.exam@unipune.ac.in

३) सर्व विद्यार्थ्यांचा (५ ते ६ हजार विद्यार्थी) १५ डिसेंबर रोजी निकाल लावणार असल्याचं कुलगुरूंनी कबूल केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी अयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा