३५ फुट खोल विहिरीत पडलेल्या म्हशीला अखेर वाचवण्यात आले यश

सोलापूर, दि. २० जुलै २०२०: ३५ फूट खोल विहिरीत पडलेल्या गाभण म्हशीला बाहेर काढण्यात नेचर काँझर्वेशन सर्कल बाळे सोलापूर आणि राहत टीमला आले यश. बाणेगाव येथील सागर ढोणे यांच्या शेतातील एक गाभण म्हैस शेतात सकाळी ९:०० च्या सुमारास चरत असताना ती म्हैस विहिरीच्या काठावरून पाय घसरून ३५ फूट खोल विहिरीत पडली. विहिरीत चार फुटापर्यंत पाणी होते.

ढोणे हे शेतातच विहिरीच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये होते. विहिरीत काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. ढोणे हे विहिरीजवळ जाऊन पाहतात तर काय म्हैस विहिरीत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तात्काळ त्यांनी त्यांचे चुलत बंधू बापू ढोणे यांना बोलावून घेतले. त्यांच्या बरोबर गावातील वीस ते पंचवीस लोक ढोणे यांच्या शेतात जमा झाले.

बापू ढोणे हे बाळे येथील नेचर काँझर्वेशन सर्कलचे सदस्य सुरेश (दाजी ) क्षीरसागर यांचे मित्र असल्याने क्षणाचाही विलंब न करता सदर घटनेची माहिती त्यांनी क्षीरसागर यांना फोनवरून दिली.

सदर घटनेची माहिती मिळताच क्षीरसागर यांनी संतोषभाऊ धाकपाडे यांना बोलावून घेतले. तसेच राहत टीमचे राकेश चितोड सरांनाही याची माहिती देण्यात आली. राहत टीमचे राकेश सर, अजित मोटे आणि सोमनाथ देशमुखे हे तिघे आपले वाहन घेऊन घटना स्थळाकडे निघाले.

बाळे NCCS टीमचे सुरेश क्षीरसागर, संतोषभाऊ धाकपाडे, धनंजय काकडे, उमेश सरगर, चंदन काकडे आणि संजीव माडीवाळ हे सर्वजण अर्ध्या तासात घटनास्थळी पोहचले. बाळे NCCS च्या टीमने म्हशीला बाहेर काढण्यासाठी सोबत बेल्ट, दोरी घेऊन आले. लॉकडाउनमुळे क्रेन मिळाली नसल्याने तोपर्यंत ढोणे यांनी देखील JCB मशीन आणि ट्रॅक्टर बोलावून घेतले होते.

नेचर काँझर्वेशन सर्कल, राहत टीम आणि स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने म्हशीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालू केले. अगोदर जाड नायलॉन रस्सीची जाळी मध्ये त्या म्हशीचे पाय घालून घेतले. नंतर त्या म्हशीच्या शरीराला दुखापत होऊ नये म्हणून वाकळ आणि पोत्याच्या साहाय्याने गुंडाळून घेतले आणि बेल्टच्या साहाय्याने बांधून घेतले. मागच्या पायाला पुढच्या पायाला बेल्ट लावून घेतले व त्या बेल्टला दोन जाड रस्सीचे एक टोक बांधून घेतले. दुसरे टोक JCB ला बांधून घेतले. अजून एक जाड रस्सीचे टोक त्या म्हशीला बांधून दुसऱ्या बाजूने ट्रॅक्टरने ओढून धरण्यास लावले. हळूहळू JCB च्या साहाय्याने त्या म्हशीला वर ओढून घेण्यात आले.

अशाप्रकारे एक तासाच्या अथक परिश्रमानंतर त्या म्हशीला बाहेर काढण्यात यश आले. यावेळी राहत टीमचे राकेश चितोड, अजित मोटे, सोमनाथ देशमुखे तसेच नेचर काँझर्वेशन सर्कल बाळे सोलापूरचे सदस्य सुरेश क्षीरसागर, संतोषभाऊ धाकपाडे, धनंजय काकडे, उमेश सरगर, चंदन काकडे, संजीव माडीवाळ आणि शेतकरी बांधव, बाणेगाव नागरिक आदीने परिश्रम घेतले.


न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा