मुंबई, २२ ऑक्टोबर २०२०: सीबीआयला राज्यात चौकशी करण्यासाठी दिलेली परवानगी मागे घेण्यात आली आहे, असे सांगत महाराष्ट्र सरकारने एक आदेश जारी केला आहे. तथापि, महाराष्ट्र शासनाकडून परवानगी मागे घेतल्याने सध्या सुरू असलेल्या तपासावर कोणताही परिणाम होणार नाही.
परंतु, भविष्यात महाराष्ट्रातील नवीन प्रकरणाची चौकशी सीबीआयला करायची असेल तर कोर्टाने चौकशीचे आदेश दिले नसल्यास राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे.
सीबीआय करत आहे सुशांत प्रकरणाची चौकशी
महाराष्ट्र सरकारचा आदेश अशा वेळी आला आहे जेव्हा सीबीआय बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूची चौकशी करत आहे. बिहार सरकारच्या सूचनेनुसार सीबीआय सुशांत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई मध्ये आहे.
मात्र, सुशांतसिंग राजपूत प्रकरणात अद्याप चौकशी सुरू आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरणाविषयी मीडियामध्ये अशी अटकळ होती की सीबीआय एका निष्कर्षावर पोहोचली आहे. यानंतर सीबीआयने या अटकळांना फेटाळून लावत म्हटले आहे की या प्रकरणात अद्याप तपास सुरूच आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे