कोरोना काळात महाराष्ट्राने केलेल्या कामाचे केंद्राकडून कौतुक

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर २०२० : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल महाराष्ट्रासह सात राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करुन तिथल्या कोविड स्थितीचा आढावा घेतला. जास्तीत जास्त संख्येने कोविड चाचण्या करण्यावर भर द्या, असा सल्ला डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी दिला.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोविड नियमांचे पालन हीच सर्वात जास्त परिणामकारक सामाजिक लस आहे, असे त्यांनी चर्चेदरम्यान सांगितले.

कोरोना काळात महाराष्ट्र राज्याने सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जे नाविन्यपूर्ण निर्णय घेतले, त्याबद्दल डॉक्टर हर्षवर्धन यांनी यावेळी कौतुक केले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यावेळी उपस्थित होते.

कोरोना नियंत्रणासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून चाचण्यांचे दर कमी करणे, एचआरसीटी चाचण्यांच्या दरांवर नियंत्रण, प्लाझ्माच्या दरावर तसेच मास्कच्या दरांवर नियंत्रण, खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राखीव ठेवणे, महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व नागरिकांना लागू करणे, माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यासारखे चांगले आणि अभिनव निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतले. ते अन्य राज्यांसाठीही उपयुक्त ठरतील अशा शब्दात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले.

राज्यातील सर्व खासगी डॉक्टरांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण मिळण्याची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी केली. त्यावर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा