नवी दिल्ली, २४ एप्रिल २०२१: कोरोना साथीच्या काळात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. प्रधानमंत्री गरीब कल्याण अण्ण योजनेंतर्गत पुढील दोन महिन्यांसाठी (मे आणि जून) प्रत्येकी ५ किलो धान्य देण्याची सरकारने घोषणा केलीय. केंद्र सरकारच्या या उपक्रमाचा ८० कोटी लोकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.
कोरोना साथीच्या सद्यस्थिती लक्षात घेता केंद्र सरकार येत्या दोन महिन्यांत धान्य देईल, असं सांगण्यात आलंय. यासाठी २६,००० कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च केले जातील. देशात कोरोनामुळं परिस्थिती गंभीर असल्याचं दिसून येत असताना सरकारने ही घोषणा केलीय.
पंतप्रधान मोदी शुक्रवारी म्हणाले की, जेव्हा देश कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेचा सामना करीत आहे, त्यावेळी गरीबांना पौष्टिक धान्य मिळणं फार महत्वाचं आहे. या योजनेवर सुमारे २६ हजार कोटी रुपये खर्च करून ८० कोटी लोकांना शासनाचा फायदा होईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सरकारने गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या वेळी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत लोकांना धान्य वाटप केलं होतं.
देशातील कोरोना साथीचा रोग सतत भयावह रुप घेत आहे. बर्याच राज्यात, बेड पासून ते ऑक्सिजनपर्यंतची कमतरता समोर येत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी कोरोनामुळं सर्वाधिक प्रभावित झालेल्या १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीला महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, केरळ आणि दिल्लीसह इतर काही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे