बारामती,२७ ऑगस्ट २०२०: खासदार राजू शेट्टी यांनी आज दि. २७ गुरुवार भिगवण चौकातील शारदा प्रांगण येथून शासनाने दूध दराला पाच रुपये अनुदान द्यावे यासाठी जनावरांना घेऊन मोर्चा काढला होता. खासदार राजु शेट्टी यांनी शांततेने मोर्चा काढून पोलीस प्रशासनानाल मदत करण्याचे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांना केले, या मोर्चाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील पाठिंबा दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोर्चाला भिगवण चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. इंदापुर चौक, गुणवडी चौक, पानगल्ली मार्गे मोर्चा प्रशासन भवन येथे आल्यावर पोलिसांनी अडवल्यावर येथे मोर्चाची सांगता झाली. यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी सरकार व विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना जरा मातोश्रीच्या बाहेर या आणि डोळे उघडून हे अलिबाबा चाळीस चोर कसे राज्याला लुटत आहेत ते बघावे अशी जहरी टीका करत सध्या राज्यात सत्ताधारी तसेच विरोधक आम्ही दोघे मावस भाऊ दोघे वाटून खाऊ अशी परिस्थिती असल्याचे शेट्टी यावेळी म्हणाले. तर सध्या ज्यांच्या ताब्यात असणारे दूध संघ व तेथील दूध व मिळालेला भाव याची यादी वाचत सरकारला कोट्यवधी रुपयांना गंडा घालत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. सरकारला २५ रुपयांनी दूध विकले आणि शेतकऱ्यांना मात्र १७ रुपये दर देत असल्याचे म्हणाले. हे सगळे जर मुख्यमंत्री बघत असतील तर शेतकऱ्यांनी हातात लोढणे का घेऊ नये असा संतप्त सवाल शेट्टी यांनी यावेळी केला.
आज पुणे जिल्ह्यातील आंदोलन बारामती मध्ये करत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. कॉल्डड्रिंक १५० रुपये लिटर, पाण्याची बाटली एक लिटर दुधा पेक्षा महाग मिळत असल्याने आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरलो असल्याचे यावेळी खासदार शेट्टी यावेळी म्हणाले. यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी देखील कडाडून टीका करत पाच रुपये अनुदान कमीच आहे, मात्र सध्याची परिस्थिती पाहता पाच रुपये मागणी असल्याचे पाटील म्हणाले. मागच्या वेळी उसाच्या दरासाठी आम्ही बारामतीत आलो होतो आणि दरवाढ घेऊन गेलो. दूधदर वाढीसाठी देखील गरज पडल्यास जहाल आंदोलन करू, असा इशारा यावेळी पाटील यांनी दिला. तर प्रदेशाध्यक्ष अमर पाटील व दशरथ राऊत यांनी देखील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव