पुणे, ११ नोव्हेंबर २०२२ : दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो. याचं प्रमाण शेतकरी वर्गामध्ये अधिक आहे. अशीच एक घटना वडगाव येथे घडली. येथील तक्रारदार आपली तक्रार देण्यासाठी चक्क रेडा घेऊन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पोहोचला.
वडगाव येथे पाण्याची पाईपलाईन लिकेज झाली होती. सदर गोष्ट वारंवार सांगूनही यावरती उपाय करण्यात आला नाही. म्हणून येथील तक्रारदारानं आपल्या रेड्यासह तक्रार दाखल करण्यासाठी आपला मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयाकडं वळवला. तिसऱ्या मजल्यावर ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचला. जोपर्यंत तक्रार दाखल करून घेत नाही तोपर्यंत मी रेडा घेऊन जाणार नाही, यावरती तो आडून राहिला.
ग्रामीण भागामध्ये यावर्षी परतीच्या पावसाने अतोनात नुकसान केलंय. शेतकऱ्यांना वेगवेगळे प्रश्न भेडसावत आहेत. यातच दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींवरही त्यांना उपाय मिळत नसेल तर शासन दरबारी शेतकऱ्यांची दखल कधी घेतली जाणार हाच महत्त्वाचा प्रश्न आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर