तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत बिकट

तुळजापूर ९ फेब्रुवारी २०२४ : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत बिकट झाली असून मृत्यू नंतर अखेरचा प्रवासही यातनादायी ठरत आहे. येथील स्मशान भूमीत ना लाईटची व्यवस्था आहे ना पाण्याची व्यवस्था. येथील ग्रामपंचायतीने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले असुन रात्रीचा अंत्यविधी अक्षरशः चार चाकी गाडीच्या लाईटचा आधार घेऊन करावा लागत आहेत. स्मशानभूमीत पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे मृतदेहाला शेवटचे पाणी मिळनेही मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत शोकाकुल कुटुंबाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच येथे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांचेही हाल होत आहेत.

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव हे दहा हजार लोकसंख्येचे एक मोठे गाव असुन या गावांमध्ये जवळपास पाच ते सहा स्मशानभूमी आहेत. त्या सर्वच स्मशानभूमीची अवस्था एक सारखीच आहे. या गावात सर्वच राजकीय पक्षातील दिग्गज मंडळी वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांच्याच गावातील स्मशानभूमीची अशी अवस्था असणे हे अत्यंत दुर्दैवी व खेदजनक बाब आहे. येथील नागरिकांना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे नाव मोठे व लक्षण खोटे म्हणण्याची वेळ आली आहे. आता तरी ग्रामपंचायत लोकप्रतिनिधीनी जागे होऊन सर्व स्मशानभूमीमध्ये लाईट व पाण्याची व्यवस्था करावी व अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी बाकडे टाकावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी जवळपास पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला असुन इस्टिमेटकरून हे लवकरच काम सुरु केले जाईल तसेच लाईटसाठी केबल टाकण्यास सांगितलेअसल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिलीय. याउलट, दोन वर्ष झालं स्मशानभूमीत नुसता पोल आणून रोवला आहे. बसायला बाकडे नाहीत जागा मिळेल तिथं उभे रहावे लागत आहे. आणखी किती दिवस आम्ही हा त्रास सहन करायचा? असा संतप्त सवाल गावकरी करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनीधी : रहिम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा