सोलापूर, दि. २० जुलै २०२०: माढा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून महसूल प्रशासन पोलीस प्रशासन, पंचायत समिती, दुय्यम निबंधक कार्यालय प्रांत कार्यालय याठिकाणी पैसे दिल्याशिवाय सर्वसामान्य माणसाचे कोणतेही काम होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून भ्रष्टाचाराच्या जात्यात दळून निघत आहे. तसे तर भ्रष्टाचार सर्वत्रच होतो परंतु माढा तालुक्यात भ्रष्टाचाराने कळस गाठला असून जनतेचे खूप हाल होत आहेत. तालुक्यातील अधिकारी जनतेची अडवणूक करून मोठ्या प्रमाणावर जनतेची लूट करत आहेत. जग कोरोनाच्या महामारीने त्रस्त असून महाराष्ट्रातही कोरोनाने उच्छाद मांडला आहे. रुग्णसंख्या वरचेवर वाढत आहे अशा परिस्थितीत लॉक डाऊन व संचारबंदी लागू आहे.
परंतू अवैध धंदे मात्र जोरात सुरू असून त्याच्यावर कुठलाही अंकुश राहिलेला नाही टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीत दिवस-रात्र वाळू चोरी, मुरुम चोरी, गौण खनिज तस्करी, याच बरोबर अवैद्य दारू विक्री जुगार मटका अशा अवैध धंद्यांमुळे शहरात सर्वसामान्यांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
काही दिवसापूर्वी महसूल प्रशासनातील एका महिला मंडळ अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे या तस्करीला चाप लावण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासनाने वाळू तस्करांशी संगनमत करून सदर महिला मंडळ अधिकाऱ्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला व हे प्रकरण दाबून टाकले. त्यामुळे यापुढे कोणताही अधिकारी आपल्या कर्तव्याशी प्रमाणिकपणा दाखवण्याचा प्रयत्न करणार. नाही अशी खंत शिवसेनेचे माढा विधानसभेचे उमेदवार संजय कोकाटे यांनी पत्राद्वारे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्याकडे व्यक्त केली आहे.
कोकाटे यांच्या या पत्रामुळे एक तर भ्रष्ट अधिकारी विरोधकांना जुमानत नाहीत अथवा या अवैध धंद्यांना सत्ताधारी पक्षाकडून पाठबळ मिळत असावे असेच चित्र निर्माण होते. खरेतर कोकाटे यांनी व शिवसैनिकांनी या भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन उभा करून जनतेला मदत करणे गरजेचे आहे. अथवा महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांची बदली करणे अथवा त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे असताना कोकाटे यांच्या पत्रामुळे तालुक्यातील जनतेच्या भुवया उंचावल्या असून हे अवैध धंदे नक्की कोणाचे आमदार बबनराव शिंदे या प्रकरणात लक्ष घालून काही कारवाई करणार की भ्रष्ट अधिकारी व अवैद्य धंदेवाल्यांना पाठीशी घालणार याकडे माढा तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे यासह या सर्व पत्रव्यवहाराच्या मुळाशी परवाचे वाळू तस्करी प्रकरण तर नाही ना अशी चर्चा जनतेतून होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील