बॅगी ग्रीन- कहानी जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट कॅपची

इंग्लंडमध्ये क्रिकेटचा जन्म झाला. इंग्लंड हे जगातील बहुतांश देशांवर राज्य करत असल्याने त्यांनी तो खेळ त्या त्या देशांत नेला. इंग्लंड पाठोपाठ क्रिकेटवर सर्वात आधी कोणी प्रेम केले असेल तर तो देश म्हणजे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाने क्रिकेटला क्लॅरी ग्रिमेट पासून ते आजपर्यंतच्या मार्नस लाबूशंगे सारखे सर्वोत्तम खेळाडू दिलेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने कायमच आपला दबदबा राखला. क्रिकेटप्रति त्यांची असलेली निष्ठा आणि प्रेम हे वादातीत आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला एक परंपरा देखील आहे. त्या परंपरेचा भाग होणे प्रत्येक युवा ऑस्ट्रेलियन खेळाडूचे स्वप्न असते. याच परंपरेतील एक हिस्सा म्हणजे ऑस्ट्रेलियन कसोटी खेळाडू घालतात ती टोपी म्हणजेच बॅगी ग्रीन. १८७७ मध्ये ऑस्ट्रेलिया आपला पहिला कसोटी सामना खेळला. हाच सामना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला सामना म्हणून देखील ओळखला जातो. या सामन्यात सर्वात प्रथम ऑस्ट्रेलियन संघ बॅगी ग्रीन घालून उतरला. तेव्हापासून आजतागायत या बॅगी ग्रीनला ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये सर्वात मानाचे स्थान आहे.

पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व डेव्ह ग्रेगरी यांनी केले परंतु पहिली बॅगी ग्रीन घालण्याचा मान मात्र चार्ल्स बॅनरमन यांना मिळाला. यानंतर ही बॅगी ग्रीनची प्रथा सुरू झाली. त्यावेळेच्या छायाचित्रावरून हे स्पष्ट होत नाही की ती टोपी बॅगी ग्रीन होती पण, ऑस्ट्रेलियन असल्याचा गर्व म्हणून ती टोपी घातली जात. १८७७ पासून प्रत्येक कसोटी खेळणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू ही बॅगी ग्रीन घालत.१९९० त्यानंतर मात्र याला एक विशिष्ट सन्मान दिला गेला. तत्कालीन कर्णधार मार्क टेलर त्यापाठोपाठ स्टीव वॉ यांनी एक राष्ट्रीय प्रतिक म्हणून तिला जपण्यास सुरुवात केली. बॅगी ग्रीनवर ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय प्रतीके चिन्हांकित केलेली आहेत. सर्वात वरच्या भागात उगवता सूर्य दाखवलेला आहे. त्याच्याखाली एका ढालीच्या प्रतिकृतीत चार भागात एक सोन्याचे धड, कुदळ आणि पावडे, एक जहाज व गव्हाच्या पिकाचे छायाचित्र आहे. ढालीच्या दोन्ही बाजूला ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कांगारू आणि राष्ट्रीय पक्षी इमु यांची चित्रे आहेत.

त्याआधी, सर्व खेळाडूंच्या किट बॅगमध्ये ही बॅगी ग्रीन असत. प्रत्येक दौऱ्यावर नवीन कपड्यासोबत बॅगी ग्रीन ही दिली जात.काही खेळाडू त्याचा वापर वैयक्तिक कारणांसाठी करत. जसे की, बिल लॉरी त्यांच्या कबुतराचे घरटे साफ करण्यासाठी, बिल पोन्सफोर्ड रंगकाम करताना डोक्यावर घालत. इयान चॅपल यांनी एकही बॅगी ग्रीन आपल्याजवळ ठेवली नाही. स्टीव्ह वॉने बॅगी ग्रीनची प्रतिष्ठा राखण्यासाठी संघ सहकाऱ्यांना सांगितले होते की,

” ही टोपी आपल्या परंपरेचा एक भाग आहे. तुम्ही आपल्या देशासाठी खेळत आहात. सोबतच तुमचा बहुमान या टोपीमुळे होत असतो. या टोपीची प्रतिष्ठा धुळीस मिळणार नाही याची खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे.”

वॉने असा नियमच केला की, खेळाडूंना एकदाच ही बॅगी ग्रीन देण्यात येईल. हा अलिखित नियम आहे. परंतु, प्रत्येक ऑस्ट्रेलियन खेळाडू तो पाळण्याचा प्रयत्न करत असतो. वॉच्या आधी, मार्क टेलरने पदार्पण करणाऱ्या खेळाडूला सामन्याआधी एका छोटेखानी सोहळ्यात बॅगी ग्रीन प्रदान करण्यास सुरुवात केली. वॉने यामध्ये सुधार करत नवोदित खेळाडूंना माजी खेळाडूच्या हस्ते बॅगी ग्रीन देण्याचा उपक्रम सुरू केला. जर फलंदाज पदार्पण करत असेल तर त्याला फलंदाजाच्या हस्ते आणि गोलंदाज पदार्पण करत असेल तर त्याला गोलंदाजाच्या हस्ते असा हा नियम होता. पुढे, रिकी पॉंटिंगने स्वतःच्या हस्ते बॅगी ग्रीन देण्याचे ठरवले. मार्क टेलरने स्टीव्ह वॉच्या सांगण्यावरून, प्रत्येक कसोटीच्या पहिल्या सत्रात बॅगी ग्रीन घालने अनिवार्य केले. कायम Sun Hat वापरणाऱ्या शेन वॉर्न यांनेदेखील या गोष्टीला विरोध केला नाही. परंतु, सध्याचे क्रिकेटर समोर वेगवान गोलंदाज असल्याने हेल्मेटला पसंती देतात.

बॅगी ग्रीन एकप्रकारचे राष्ट्रीय प्रतीक असल्याने जेव्हा कधी एखाद्या खेळाडूच्या बॅगी ग्रीनचा लिलाव होतो त्यावेळी त्यातून घसघशीत रक्कम मिळत असते. डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या शेवटच्या डावात घातलेल्या बॅगी ग्रीनचा २००३ मध्ये लिलाव केला तेव्हा, त्यातून ४२५,००० ऑस्ट्रेलियन डॉलर इतकी रक्कम मिळाली. कीथ मिलर यांच्या बॅगी ग्रीनला देखील ३५,००० ऑस्ट्रेलियन डॉलर मिळाले होते. संपूर्ण क्रिकेट विश्वात बॅगी ग्रीनला इतका मान आहे की, एक सामना खेळलेल्या खेळाडूची बॅगी ग्रीनदेखील १०,००० ऑस्ट्रेलियन डॉलर पेक्षा कमी विकली जात नाही.

दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्न याने याच वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या लोकांच्या मदतीसाठी आपली बॅगी ग्रीन लिलावात ठेवली होती. त्याच्या बॅगी ग्रीनला कॉमनवेल्थ बँकने तब्बल १,००७,५०० ऑस्ट्रेलियन डॉलर इतकी रक्कम देत खरेदी केली आहे.

चार्ल्स बॅनरमन यांनी पहिली बॅगी ग्रीन परिधान केल्यानंतर आत्तापर्यंत जे रीचर्डसन याच्या पर्यंत ४५८ खेळाडूंनी बॅगी ग्रीन आपल्या डोक्यावर चढवली आहे.
डॉन ब्रॅडमन यांची १२४, स्टीव्ह वॉ याची ३३५, रिकी पॉंटिंग यांची ३६६ आणि दिवंगत खेळाडू फिल ह्युज याची ४०८ क्रमांकाची बॅगी ग्रीन यांना विशिष्ट सन्मान दिला जातो.

क्रिकेटचे नियमन करणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लबने, बॅगी ग्रीनला ,” जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट कॅप ” अशी उपाधी दिलेली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा