नागपूर, २७ फेब्रुवारी २०२४ : जिल्हा परिषद उच्च प्रथमिक शाळा केंद्र आजनगाव अंतर्गत धामनगांव, मांगली तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरवा येथील शाळेत विद्यार्थ्यांना वाचनसंस्कृतीशी जोडण्यासाठी विशेष छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्याशी संवाद साधण्यासाठी परभणी येथील अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे सर, केंद्रप्रमुख डॉ. शिल्पा सुर्यवंशी तसेच नागपूरच्या पत्रकार निता सोनवणे या आल्या होत्या.
विनोद शेंडगे यांनी ‘वाचाल तर वाचाल’ म्हणत वाचनाचे महत्व सांगत वाचनाविषयी गोडी कशी निर्माण करायची? हे अगदी सहजपणे हसतखेळत विद्यार्थ्याना पटवून सांगितले. त्यांना वाचनाची गोडी लावतांना ‘एक दोन तीन चार- आम्ही सारे पुस्तक वाचणार, पाच सहा सात आठ- वाचणाऱ्यांचा थाटमाट’ असे मुलांकडून वदवून सुद्धा घेतले.
बदलत्या काळात विद्यार्थ्यांचा कल हा मोबाईलकडे गेला असताना दुसरीकडे परभणी येथील एक ध्येयवेडा शिक्षक मुलांना मोबाईलपासून दूर करत पुस्तक वाचनाची गोडी लावत आहे. मागील तीन वर्षापासून बालमनावर संस्कार रूजवण्यासाठी त्यांनी अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्र सुरू केले असून त्यांच्या या उपक्रमाला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यामध्ये पुस्तक वाचनाची जणू ओढचं लागली आहे. हे विद्यार्थी फक्त पुस्तकचं वाचत नाहीत तर प्रत्येक पुस्तकातून स्वबोलीभाषेत नोंदी सुद्धा काढत आहेत. एवढेच नाही तर लेखकाला पत्र लिहून मनातील भावनाही बोलून दाखवतात आणि आपण यातून काय शिकलो आणि आपल्या जीवनावर याचा काय परिणाम झाला आहे? हे सुद्धा सांगत असतात. उद्याचा सुजाण नागरीक घडवण्याचे कार्य विनोद शेंडगे सर करत आहेत. एवढेच नाही तर घराघरात वाचन समृद्ध व्हावे यासाठी जनजागृती करत त्यांनी आतापर्यत सहा हजार किलोमीटर सायकलप्रवास केला आहे. घरातील प्रत्येक सदस्याने पुस्तक वाचावे आणि इतर गोष्टीप्रमाणेच पुस्तक वाचन सुद्धा सहकुटूंब करावे यावर ते भर देतात.
याप्रसंगी जि. प. उ. प्रा. शाळा धामणगाव येथील सौ. करंडे, श्री. हजारे, श्री. मस्के, जि. प. उ. प्रा. शाळा मांगली तेली येथील श्री. चौधरी, श्री. मेश्राम, सौ. अर्चना चौधरी, सौ. घुघूस्कर तसेच जि. प. उ. प्रा. शाळा चिरवा येथील सौ. ठोंबरे, सौ. गिते, श्री नागरगोजे, श्री. भोयर या शिक्षकवृंदानी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून विद्यार्थ्यांना नवी दिशा देण्याकरीता अक्षर आनंद वाचन संस्कार स्पर्धा घेण्यास पुढाकार घेतला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे