ज्या दिवशी सत्तेत येईल, तिन्ही कृषी कायदे कचऱ्याच्या डब्यात टाकेल: राहुल गांधी

6

पंजाब, ४ ऑक्टोंबर २०२०: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नव्या कृषी कायद्याविरोधात पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्ला केला आहे. पंजाबच्या मोगा येथे खेती बचाओ यात्रेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जर सरकारला हे विधेयक मंजूर करायचंच होतं तर सर्वप्रथम  लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा करायला हवी होती. राहुल गांधी म्हणाले की, मी शेतकर्‍यांना हमी देतो की ज्या दिवशी कॉंग्रेस सत्तेवर येईल त्या दिवशी हे तीन काळे कायदे रद्द करून त्यांना केराची टोपली दाखवली जाईल.

काँग्रेस शेतकर्‍यांच्या पाठीशी उभी आहे

राहुल गांधी म्हणाले की, पंजाबमधील शेतकऱ्यांना हे आश्वासन द्यायचं आहे की, कॉंग्रेस देशभरातील शेतकर्‍यांच्या पाठीशी उभा आहे आणि कॉंग्रेस आपल्या आश्वासनापासून एक इंच मागे जात नाही. राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारला एमएसपी रद्द करायचा आहे आणि शेतीचा संपूर्ण बाजार अंबानी आणि अदानी यांच्याकडं सोपवावा अशी त्यांची इच्छा आहे, परंतु कॉंग्रेस पक्ष असं होऊ देणार नाही.

राहुल म्हणाले की, या नवीन कायद्यांबाबत शेतकरी खूष आहेत तर मग देशभरात शेतकरी आंदोलन का करतात?  पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन का करतात?  राहुल म्हणाले की कोरोना काळात हे तीन कायदे लागू करण्याची घाई काय होती.

… तर शेतकऱ्यांना अंबानी आणि अदानी यांच्याशी बोलावं लागंल

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, शेतकर्‍यांचं उत्पादन विकत घेण्याच्या विद्यमान यंत्रणेत त्रुटी असल्याचं त्यांचं मत आहे.  परंतु ही व्यवस्था सुधारण्याची गरज आहे, ती नष्ट करण्याची गरज नाही, कारण जर ही व्यवस्था नष्ट झाली तर त्यामुळं शेतकऱ्यांकडं काहीही शिल्लक राहणार नाही आणि त्या शेतकऱ्याला थेट अंबानी आणि अदानी यांच्याशी बोलावं लागंल आणि या संभाषणात शेतकरी मारला जाईल.

हे मोदी सरकार नसून अंबानी – अदानींचं सरकार आहे

राहुल गांधी पुन्हा म्हणाले की, देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे, परंतु हे चुकीचं आहे, ते अंबानी आणि अदानींचं सरकार आहे. ते म्हणाले की, अंबानी आणि अदानी मोदींना चालवतात, जीवनदान देतात. यासाठी माध्यमांचा वापर केला जातो. राहुल म्हणाले की, मोदीजी त्यांच्यासाठी जमीन साफ करतात आणि ते मोदीजींचं समर्थन करतात.

यावेळी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड यांनीही ट्रॅक्टरचा प्रवास केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे