पुणे, २० जानेवारी २०२३ : जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरील बंद पडलेल्या कंपनीचत गुरुवारी (ता.१९) सकाळी साडेआठच्या सुमारास आवारात ईश्वर देवराम अहिरे (वय ६६, रा. रामनगर) या सुरक्षारक्षकाचा मृतदेह पूर्णपणे जळलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांकडून वृद्धाने आत्महत्या केली, की त्याच्यासोबत घातपात झाला, याचा तपास केला जात आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी, की शहरातील मेहरुण परिसरातील रामनगरात ईश्वर अहिरे हे वास्तव्यास असून, ते सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर असलेल्या विक्रम प्लास्टिकच्या बंद पडलेल्या कंपनीत गुरुवारी (ता.१९) सकाळच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला. त्या ठिकाणी काम करणारे सुरक्षारक्षक काशीनाथ मराठे हे रात्रीची ड्युटी करून परत येत होते. त्यांनी कंपनीचे गेट उघडताच त्यांना कंपनीच्या आवारात काहीतरी जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता एक व्यक्ती जळालेल्या अवस्थेत दिसून आला. मराठे यांनी घटनेची माहिती लगेच सुरक्षारक्षक पुरविणार्या मालकाला दिली. मालकान घटनास्थळी धाव घेत पोलिसांना घटनेबाबत कळविले.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तीन ते चार दिवसांपूर्वीच ईश्वर अहिरे यांचा पगार झाला होता. तेव्हापासून ते कामावर जात नव्हते; तसेच त्यांना दारूचे व्यसन असल्याने ते दिवसभर दारूच्या नशेत राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वृद्धाच्या मृत्युबाबत वेगवेगळी कारणे समोर येत आहेत.
पत्नीचाही झाला होता जळून मृत्यू
काही वर्षांपूर्वी मृत ईश्वर अहिरे यांच्या पत्नीचा जळून मृत्यू झाला होता. तर त्यांच्या नातूने काही दिवसांपूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती. घटनेच्या दिवसापासून अहिरे हे प्रचंड दारूच्या नशेतही राहत होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
मृत ईश्वर अहिरे यांची ओखळ पटल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अहिरेंचा मृतदेह बघताच त्यांनी मन हेलावणारा आक्रोश केला. पंचनामा झाल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला.
अपघात की घातपात?
वृद्ध सुरक्षारक्षकाच्या जळालेल्या मृतदेहाबाबत घटनास्थळावर वेगवेगळया चर्चा सुरू होत्या. यावेळी वृद्धाला कुणी जाळले असावे किंवा सुरक्षारक्षक हा शेकोटी करण्यासाठी आला असावा आणि मद्याच्या नशेत आगीत पडून मृत झाला असावा; तसेच वृद्धाने दारूच्या नशेत आत्महत्या केली असावी, अशीही चर्चा सुरू असून, वृद्धासोबत घातपात झाला की त्याचा अपघात झाला, याबाबत पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.
पोलिसांनी घटनास्थळाची दाखल झाल्यानंतर संपूर्ण कंपनीचीही पाहणी केली. दरम्यान, घटनेची वार्ता संपूर्ण परिसरात परसताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यावेळी मृताच्या बुटावरून ते ईश्वर अहिरे यांचा मृतदेह असल्याचे समोर आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत शुभम लालसिंग ठाकूर यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील