अहमदाबाद येथे आज रंगणार भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेतील निर्णायक सामना

पुणे, १ फेब्रुवारी २०२३ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज बुधवारी ट्वेंटी-२० मालिकेतील निर्णायक सामना रंगणार आहे. न्यूझीलंड संघाने रांचीमध्ये खेळला गेलेला पहिला सामना २१ धावांनी जिंकला. तर दुसरा सामना यजमान भारताने दमदार पुनरागमन करीत लखनौमध्ये सहा गडी राखून जिंकला. आता ही मालिका कोणाच्या नावावर होणार, याचा निर्णय अहमदाबादमध्ये होणार आहे. याआधी भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडचा ३-० असा धुव्वा उडविला होता.

या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे तरुणांना त्यांच्यातील कलागुण दाखविण्याची संधी मिळाली. शुभमन गिल, इशान किशन आणि राहुल त्रिपाठी यांना या संधीचे सोने करण्यात यश आले नाही. या मालिकेनंतर भारत दीर्घकाळ ट्वेंटी- २० सामना खेळणार नाही. त्यामुळे या खेळाडूंसाठी ही शेवटची संधी आहे.

बांगलादेशात द्विशतक झळकावल्यानंतर इशान बॅटमध्ये लय शोधण्यात अपयशी ठरला आहे, तर गिललाही टर्निंग बॉलचा सामना करावा लागला आहे. ट्वेंटी-२० मध्ये एकदिवसीय फॉर्मेटची पुनरावृत्ती करण्यात गिल अपयशी ठरला आहे. नियमितपणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या कोहलीच्या अनुपस्थितीत त्रिपाठीला मिळालेल्या संधींचा फायदा उठविता आलेला नाही. रविवारी सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्या खेळीमुळे भारताने मोठ्या मुश्किलीने १०० धावांचे लक्ष्य गाठले.

गोलंदाजीत युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या जोडीने भारताला विरोधी संघावर दबाव आणण्यास मदत केली आहे. दुसऱ्या ट्वेंटी-२० मध्ये खेळपट्टीने खूप मदत केली असूनही, चहलने केवळ दोन षटके टाकली, तर लेगस्पिनरने सलामीवीर फिन ॲलनला बाद केले. नो-बॉलशी झुंज दिल्यानंतर, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग लखनौमध्ये चांगल्या लईत दिसला, ज्यामुळे निर्णायक सामन्यापूर्वी त्याचे मनोबल वाढले असेल.

दुसरीकडे, न्यूझीलंडला त्यांच्या मधल्या फळीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. भारतात मालिका जिंकण्याची कामगिरी न्यूझीलंड संघाला प्रेरणा देण्यासाठी पुरेशी आहे. ग्लेन फिलिप्सला अद्याप आपली आक्रमक फलंदाजी सादर करता आलेली नाही आणि बुधवारी संघाला त्याच्याकडून सामना जिंकणाऱ्या खेळीची अपेक्षा असेल. एकदिवसीय मालिकेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या मायकेल ब्रेसबेलकडूनही मोठी खेळी अपेक्षित आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या मार्क चॅपमनकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा