एन साईबाबा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने केला रद्द

नवी दिल्ली, १५ ऑक्टोंबर २०२२ : नक्षल समर्थक प्रा. जी. एन. साईबाबा व त्यांच्या सहकाऱ्यांना निर्दोष मुक्त करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आलीय. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रा. जी. एन. साईबाबा व त्यांच्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी आज पार पडली.

सुनावणी दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे ओढत, या निर्णयात त्रुटी असल्याचं म्हटलं. तसेच आरोपींची मुक्तता करताना गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेण्यात आला नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं.

नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती रोहित देव आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी या प्रकरणातील अन्य पाच दोषींचे अपिलही मान्य करून त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. खंडपीठाने त्यांना तुरुंगातून तात्काळ सोडण्याचे आदेश दिले होते. साईबाबा सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांना २०१४ मध्ये दिल्लीत अटक करण्यात आली होती. २०१२ मध्ये रिव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंटची (ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये बंदी घातलेल्या माओवाद्यांची आघाडीची संघटना) परिषद झाली होती. ज्यामध्ये साईबाबा सहभागी झाले होते, असा त्यांच्यावर आरोप होता. साईबाबांचे एक भाषण होते, ज्यात त्यांनी लोकशाही सरकारच्या स्थापनेचा निषेध केल्याचं म्हटलं होतं. साईबाबा नेपाळ आणि श्रीलंकासारख्या विविध देशांतील माओवाद्यांच्या संपर्कात असल्याचा दावाही फिर्यादीने केला होता.

मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. साईबाबावरील गंभीर आरोप ग्राह्य धरत सुप्रीय कोर्टाने ही स्थगिती दिली. त्यामुळं त्यांची सुटका होणार नाहीये. यूएपीएच्या अंतर्गत शिक्षा होते तेव्हा तुरुंगवासच भोगणे गरजेचे असल्याचे कोर्टाने सांगितले. कोर्टाच्या या निर्णयामुळं राज्य सरकारला दिलासा मिळालाय. केंद्र आणि राज्य सरकारसाठीही हे प्रकरणी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं होतं. सुप्रीम कोर्टाला आज सुटी असूनही विशेष सुनावणी घेण्यात आली. याशिवाय साईबाबाच्या वकिलांची नजरकैदेची मागणीही फेटाळून लावली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा