नागपुर, १७ नोव्हेंबर २०२० : नागपुरातील डबल डेकर उड्डाण पूल दिवाळीच्या दिवसापासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी शुक्रवारी या पुलाचा शुभारंभ केल्यानंतर शनिवारपासून नागपूरकर या पुलाचा वाहतुकीसाठी वापर करू लागले आहेत.
नागपुरातील अजनी चौक ते विमानतळ असा साडेतीन किलोमीटरचा उड्डाणपूल सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे. या दुमजली पुलाच्या पहिल्या मजल्यावरून ज्यांना थेट विमानतळाकडे किंवा त्यापुढे जायचं आहे अशा मोटारी धावताहेत तर दुस-या मजल्यावरून मेट्रो. अजनी चौक ते विमानतळा दरम्यानच्या भागात जाणा-या वाहनांसाठी आधीचा वर्धामार्ग पुलाखाली आहेच.
देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच डबल डेकर पूल आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मदतीने महामेट्रोनं या पुलाची निर्मिती केलीय. वर्दळीच्या वर्धा मार्गावर होणारी वाहतूक कोंडी या पुलामुळे सुटणार आहे. या पुलाच्या बांधकामाकरिता ३८१ कोटी रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खर्च केले आहेत. विशेष म्हणजे या पुलाकरता एकाही घराचं अधिग्रहण करावं लागलेलं नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी