मुंबई, २७ जून २०२१: महाराष्ट्रात रिकव्हरी रॅकेट चालवल्याच्या आरोपानं वेढलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या संकटात वाढ होतच चाललीय. देशमुख यांना पुन्हा एकदा अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) समन्स बजावलेय. त्यांना शनिवारीही बोलावण्यात आले होते, परंतु ते आले नाही. त्यांच्याऐवजी त्याच्या वकिलांनी तपास यंत्रणेकडं संपर्क साधला होता.
देशमुख यांच्या वकिलांच्या टीमचा भाग असलेले वकील जयवंत पाटील म्हणाले, माजी गृहमंत्री अनिल देशमुख शनिवारी हजर झाले नाहीत, आम्हाला या खटल्याशी संबंधित कागदपत्रे देण्यात आलेले नाहीत. जे काही मागितलं गेलंय, त्यानुसार आम्ही आमचे उत्तर देऊ.
ईडीने देशमुख यांच्या पीए आणि पीएस यांना केली अटक
मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी रुपयांची वसुली करण्याबाबतच्या केल्याच्या आरोपावरून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केलेल्या एनफोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) ने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि वैयक्तिक सचिव संजीव पलांडे यांना अटक केलीय. अटक झाल्यानंतर दोघांना शनिवारी विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं, तेथे काही संक्षिप्त युक्तिवादानंतर त्यांना १ जुलैपर्यंत ईडीच्या ताब्यात पाठविण्यात आलं.
एक सौदा करायचा आणि दुसरा वसुली करायचा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीच्या आतापर्यंतच्या तपासात शिंदे आणि पलांडे हे खंडणीच्या कामात सामील असल्याचं समोर आलंय. एक पैशाचा सौदा करायचा आणि दुसरा रोकड जमा करायचा. ईडीला त्याच्याविरोधात फोन आणि व्हॉट्सअॅप कॉलसह अनेक पुरावे सापडले आहेत. परंतु, ते देशमुख किंवा अन्य कोणासाठी पैसे वसूल करीत होते की नाही याची अद्याप खात्री झालेली नाही. सध्या ईडी टीम या दोघांची चौकशी करत आहे. अनिल देशमुख यांच्यासमोर बसून लवकरच त्यांची चौकशी केली जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे