नवी दिल्ली, २१ जुलै २०२२: राष्ट्रपती पदानंतर आता उपराष्ट्रपती पदाची निवडणुक वादात सापडली आहे. यात आता काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. आम्हाला विश्वासात घेतलं नाही, असं पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी पक्षाच्या बैठकीनंतर सांगितलं. एनडीएने पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनकर यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेससह विरोधी पक्षांनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांना जाहीर केली. मात्र आता तृणमूल काँग्रेस पार्टी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत सहभागी होणार नाही. याचा अर्थ मतदान कमी होणार, हे स्पष्ट आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारांच्या निवडीसाठी सक्रिय असलेल्या ममता बॅनर्जी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत मात्र विरोधी पक्षांपासून पूर्णपणे लांब होत्या.
अभिषेक बॅनर्जी यांनी असेही सांगितले की, आम्ही राष्ट्रपतीपदाच्या बाबतीत एनडीएच्या उमेदवाराला कोणत्याही किंमतीत पाठिंबा देणार नाही. तसेच मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देणे किंवा मतदानापासून दूर राहणे आम्हाला योग्य वाटत आहे. उमेदवार जाहीर करताना आम्हाला विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र ज्या पद्धतीने विरोधी पक्षाची अवहेलना झाली, त्यावरून या बैठकीला उपस्थित ८५ टक्के खासदारांनी या निवडणुकीपासून दूर राहायचे ठरवले आहे.
दरम्यान, ६ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. यावेळी अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले की, जर आम्ही यातून बाहेर पडलो तर मोदी आणि ममता बॅनजी एक आहे, असाच याचा अर्थ होतो का ? असा सवाल अभिषेक बॅनर्जी यांनी केलाय.
त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. निवडणुक होईपर्यंत कोण काय पावलं उचलणार हे पाहणं, औत्युक्याचं ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस