इस्रायल मध्ये नवीन सत्ता स्थापन, नफ्ताली बेनेट नवीन पंतप्रधान

जेरुसलेम, १४ जून २०२१: इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा १२ वर्षानंतर पराभव झाला आहे. विरोधी पक्षनेते आणि आघाडीचे उमेदवार नफ्ताली बेनेट यांनी इस्रायलचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. नवीन सरकारच्या शपथविधीसह गेल्या दोन वर्षात चार निवडणुकांनंतर निर्माण झालेला राजकीय पेचदेखील मिटला आहे.

नवीन सरकारची पुष्टी करण्यासाठी इस्त्रायली संसद ‘नेसेट’ मध्ये जोरदार गदारोळ झाला. अधिवेशनाच्या सुरूवातीला, नियुक्त केलेल्या पंतप्रधान नफताली बेनेट यांना धक्काबुक्की करण्यात आली. बेनेट यांनी आपले भाषण सुरू करण्याचा प्रयत्न करताच, इतर नेत्यांद्वारे त्यांना वारंवार त्रास देण्यात आला. भाषणादरम्यान, विरोधक बेनेट यांच्यावर आरोप करत त्यांच्या विरोधात आवाज उठवत होते. त्याच वेळी, नवीन सरकारमधील सहयोगी पक्षाचे नेते लॅपिड यांनी आपले भाषण देखील थांबवले. यादरम्यान झालेल्या धक्काबुक्की ला त्यांनी लोकशाहीला कलंक असल्याचे म्हटले.

दुसरीकडे, बेंजामिन नेतन्याहू यांनी संसदेत सांगितले की, माझ्या नेतृत्वात लिकुड पक्षाला मतदान करणाऱ्या व उजव्या विचारसरणीच्या पक्षांना मत देणाऱ्या अन्य लाखो इस्रायलींच्या समर्थना मुळे मी इथे उभा आहे. नेतान्याहू म्हणतात, “माझ्या प्रिय देशासाठी अहोरात्र मेहनत घेणे हा एक सन्मानाचा विषय होता.” बेनेट यांच्या भाषणाच्या तुलनेत, नेतन्याहूंच्या भाषणादरम्यान वातावरण बरेच शांत होते.

इस्राईलमधील एका छोट्या अल्ट्रानेशनलिस्ट पक्षाच्या प्रमुख नफ्ताली बेनेट यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. सत्ताधारी युतीतील आठ छोटे पक्ष नेतन्याहू यांना विरोध करण्यासाठी आणि नव्याने निवडणुका घेण्यास एकत्र आले आहेत, परंतु हे पक्ष फार काही मुद्द्यांवर सहमत आहेत. त्याचवेळी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले नेतन्याहू अजूनही संसदेत सर्वात मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत.

ते नव्या सरकारला कडाडून विरोध करतील असे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी आघाडीत सामील असलेल्या कोणत्याही पक्षाने माघार घेतली, तर नवीन सरकार आपले बहुमत गमावेल आणि सरकार पडण्याचा धोका असेल. असे झाल्यास नेतन्याहू यांना पुन्हा सत्तेवर येण्याची संधी मिळू शकेल. इस्त्रायली संसदेच्या नेसेटमध्ये १२० सदस्य आहेत. अशा परिस्थितीत किमान ६१ मतांनी बहुमताने सरकार स्थापन होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा