जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचं अन्यसाधारण महत्त्व

पुणे, ता. ५ डिसेंबर २०२२ : मृदा आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणूनच लोकांना मातीचे महत्त्व सांगण्यासाठी, मातीच्या गुणवत्तेची जाणीव आणि मातीच्या संवर्धनाची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन (World Soil Day) साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्था आज जागतिक मृदा दिन साजरा करतात. मृदा संवर्धन आणि शाश्वतेकडे व्यवस्थापनाचे लक्ष जावे, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीमुळे दिवसेंदिवस मातीवर दुष्परिणाम होत चालले आहेत. त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आज अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

जागतिक मृदा दिवस कधीपासून साजरा केला जातो?
हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे लोकांना बिघडलेल्या मातीच्या स्थितीबद्दल जागरूक करणे. त्याचबरोबर लोकांनी मातीच्या संवर्धनाकडे लक्ष द्यावे म्हणून देखील हा प्रश्न मांडण्यात आला होता. यानंतर अन्न आणि कृषी संघटनेकडून वर्ष २०१३ मध्ये ६८ व्या संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये जागतिक मृदा दिन साजरा करण्यासाठी आग्रह करण्यात आला होता. शेवटी सभेने वर्ष २०१४ मध्ये ५ डिसेंबर हा पहिला अधिकृत जागतिक मृदा दिवस म्हणून घोषित केला. तेव्हापासून ५ डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

दरवर्षी मृदा दिवस साजरा करताना एक वेगळी थीम तयार केली जाते आणि वर्षभर त्याआधारे मृदा संवर्धनासाठी जागरूकता केली जाते. वर्ष २०२२ घ्या जागतिक मृदा दिनाची थीम आहे- ‘माती : जेथे अन्न सुरू होते.’ म्हणजे माती व्यवस्थापनातील वाढत्या आव्हानांना तोंड देऊन, मातीची जागरूकता वाढवून आणि मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी समाजघटकांना प्रोत्साहन देऊन निरोगी परिसंस्था राखण्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवणे हा या थीमचा उद्देश आहे.

जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. अलीकडच्या काळात झपाट्याने वाढत चाललेले शहरीकरण, सिमेंटचे रस्ते यामुळे मृदेची अधिक प्रमाणात झीज होत आहे. त्याचबरोबर शेतीमध्ये वापरण्यात येणारी भरमसाट रासायनिक खते, शहरीकरणासाठी आणि उद्योगधंद्यांसाठी करण्यात येणारी जंगलतोड आणि इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू आहे. केवळ एक इंच सुपीक मृदेचा थर तयार होण्यासाठी आठशे ते एक हजार वर्षांचा कालावधी लागतो.

मृदेचं संरक्षण म्हणजे संपूर्ण सजीवांचं संरक्षण असाच अर्थ होतो. जगातील ९५ टक्के अन्नधान्य मृदेच्या माध्यमातून येतं; तसेच मृदेत पृथ्वीवरील एकूण सजीवांपैकी २५ टक्के सजीव आसरा घेतात. फळे, भाज्या आणि अन्नधान्याची गुणवत्ता ही मातीच्या गुणवत्तेवरूनच ठरते. सध्या या मृदेच्या संवर्धनासमोर वातावरण बदलाचं अर्थात ग्लोबल वॉर्मिंगचं मोठं आव्हान उभं आहे.

मृदेची काळजी का घेतली पाहिजे?
१) माती हा एक जिवंत स्त्रोत आणि २५ टक्क्यांपेक्षा जास्त ग्रहांचे जीवन आहे.
२) आपले ९५ टक्के अन्न मातीमधून येते. फळे, भाज्या आणि धान्य यांचे गुणवत्ता व प्रमाण मातीच्या आरोग्यावर अवलंबून आहे.
३) पृथ्वीवरील जीवन टिकवण्यासाठी मातीचे जीव सतत कार्यरत असतात.
४) माती हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगशी लढायला मदत करते.

माती प्रदूषण थांबविण्यासाठी काय करायला हवे?
१) प्लास्टिकचा वापर टाळा.
२) पर्यावरणास अनुकूल, बागकाम, साफसफाईची आणि वैयक्तिक काळजीची उत्पादने निवडा.
३) बॅटरीसारख्या घातक कचर्‍याची जबाबदारीने विल्हेवाट लावा.
४) वनस्पती आधारित आहार घ्या.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा