नांदगाव, नाशिक २७ फेब्रुवारी २०२४ : नांदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांबर्डी(साकोरा) येथे वार्षिक विद्यार्थी गुणगौरव सोहळा व स्नेहसंमेलन पार पडले. यावेळी सर्व बालकलाकारांनी आपल्या विविध कलागुणांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे दर्शन घडवले. तत्पूर्वी विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नावासह प्रथमच ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण भसरे यांच्या संकल्पनेतून यावर्षी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे पालक हे वंचित समाजातील असून मजुरी करतात तरीही आपल्या पाल्यांचे विविध कला गुण पाहून व ट्रॉफी मिळताना पाहून त्यांचे डोळे पाणावल्याचे दिसते. सांस्कृतिक कार्यक्रम म्हटला की, प्रत्येक गाण्यानुसार वेशभूषा आवश्यक असते, मग त्यासाठी पालकांच्या खिशालाच कात्री लावली जाते. शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचे पालक हे मजुरी करतात, त्यामुळे जमेल त्या पोशाखात विद्यार्थांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला. कार्यक्रमासाठी आवश्यक साऊंड सिस्टिम ही वसंत गवारे यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली. शाळेत स्पेलिंग बी, मी अधिकारी होणारच, सामान्य ज्ञान, प्रश्नमंजुषा, पाढे पाठांतर,अंकनाद स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यशस्वी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत सदस्या यशोदा डोळे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अध्यक्ष नारायण भसरे, उपाध्यक्ष मनीषा गावित व इतर सदस्य यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सदर स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक उमेश बोरसे यांनी केले तर मुख्याध्यापक अविनाश खोंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व पालकांनी सहकार्य केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे