मुंबई, २० डिसेंबर २०२२ : गोव्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निर्माते नादव लॅपीड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा प्रपोगंडा, वलगर असल्याचं म्हणत वाद निर्माण केला. त्यावर कलाकारांनी, चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी व काही राजकारणी नेत्यांनीही त्यांची मते व्यक्त केली. हा मुद्दा काही दिवस निवळला; परंतु प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा हा विषय सुरू झाला आहे. पटकथा लेखक व प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला कचरा संबोधिले आहे.
सईद अख्तर मिर्झा म्हणाले, “द काश्मीर फाइल्स हा सिनेमा माझ्यासाठी तरी कचरा आहे; पण मग काश्मीर पंडितांच्या समस्या म्हणजे कचरा आहेत का? तर नाही, असं अजिबात नाही. त्यांच्या समस्या खऱ्याच आहेत; पण हे फक्त काश्मीर हिंदूंनीच भोगलं का? तर नाही, त्यात काश्मिरी मुस्लिमही आहेत. काश्मिरी मुस्लिमांनीही गुप्तचर संस्था, तथाकथित राष्ट्रीय हितसंबंध असलेली राष्ट्रीय आणि सीमेपलीकडून पगार घेणारे लोक, जे सतत गोंधळ निर्माण करीत होते. या सगळ्यांच्या षडयंत्रात त्यांनी खूप काही भोगलं. मुद्दा बाजू घेण्याचा नाही. माणूस व्हा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. सध्या देशभक्ती हे पैसा कमावण्याचं साधन ठरत आहे आणि हे जगातले सर्वच देश करीत आहेत.”
सईद अख्तर मिर्झा यांचे अनेक चित्रपट खूप गाजले. ‘नुक्कड’ आणि ‘इंतजार’ अशा मालिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबद्दल त्यांचे मत मांडले. विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाने रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर आधारित हा सिनेमा रिलीज होऊन बराच काळ लोटला; पण अद्यापही या सिनेमाची चर्चा थांबलेली नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे