गोवा, २९ नोव्हेंबर २०२२ : गोव्यामध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया) २८ नोव्हेंबर रोजी सांगता झाली. हा निरोप समारंभ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या समारंभात मंचावर बोलताना मुख्य ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी विवेक अग्निहोत्रींनी दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर टीका केली. हा चित्रपट असभ्य आणि प्रचारकी असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
- नदाव लॅपिड म्हणाले :
आम्ही सर्वजण ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिल्यावर नाराज आणि आश्चर्यचकित झालो होतो. हा चित्रपट आम्हाला प्रचाराशिवाय दुसरं काहीही वाटत नाही. हा चित्रपट असभ्य आणि कमकुवत आहे. एवढ्या प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवासाठी हा चित्रपट पूर्णपणे निरोपयोगी आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
गोव्यात सुरू असलेल्या चित्रपट महोत्सवामध्ये गेल्या आठवड्यात ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट दाखवण्यात आला होता. विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड दाद मिळाली. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाची प्रचंड कमाई झाली आहे.
- नेमके चित्रपटात काय आहे ?
इस्लामचा स्वीकार करा काश्मीर सोडा किंवा मृत्यूला सामोरे जा हा नारा देत दहशतवाद्यांनी १९९० मध्ये काश्मीरमधील हिंदूंवर हल्ला चढवला होता काश्मिरी पंडितांना बेघर करून त्यांची निर्दयपणे हत्या केली होती हे सत्य तात्कालीन सत्ताधाऱ्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला असा दावा या चित्रपटात केला गेला आहे. तर या चित्रपटातून त्या काळाची सत्य घटना दाखवली आहे असेही दिग्दर्शकांचे व निर्मात्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, नदाव यांच्या या वक्तव्यावर ‘द काश्मीर फाइल्स’मधील कलाकारांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
- अनुपम खेर म्हणाले …
अनुपम खेर यांनी नदाफ यांच्या वक्तव्यावर ट्विट करत त्यांना चांगलेच सुनावले आहे, ते म्हणाले, खोटेपणा कितीही मोठा असला, तरी सत्याच्या तुलनेत त्याचे महत्त्व कायम कमीच असते.
- अशोक पंडित यांचे सडेतोड उत्तर
दुसरीकडे चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी सुद्धा ट्विट करत सडेतोड उत्तर दिले आहे. ते म्हणाले, इस्त्रायली चित्रपट निर्माते नवाज नदाव लॅपीड यांनी ‘द काश्मीर फाइल्सला’ असभ्य म्हणून दहशतवादाविरोधी लढलेल्या भारताच्या लढाईची खिल्ली उडवली आहे. भाजपा सरकारच्या नाकाखाली त्यांनी सात लाख काश्मिरी पंडितांचा अपमान केला आहे. इफ्फीच्या विश्वासार्हतेवर हा खूप मोठा धक्का आहे. हे अत्यंत लज्जास्पद आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे