तुमच्यातल्या कलागुणांना वाव देण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्म संघाने नवीन उपक्रम सुरू केला असून आज त्या उपक्रमाला सुरुवात झाली. ज्यात फुलोरा या कवितासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक आणि अभिनेते योगेश सोमण यांच्या हस्ते करण्यात आले. यात साठ कविता असून प्रत्येक कविता ही वेगवेगळ्या धाटणीच्या आहे.
एका सामाजिक संघटनेने काढलेला हा मोठा कविता संग्रह आहे. या कार्याचा गौरव करताना योगेश सोमण यांनी सांगितले की कवी हा मला कायम श्रेष्ठ कलाकार वाटतो, कारण तो आपल्या कल्पना शब्दांत मांडू शकतो. शब्द हीच त्याची ताकद असते, जी फार कमी जणांकडे आहे, असे मला वाटते.
या उपक्रमाच्या माध्यमातून बोलताना जिल्हा कार्याध्यक्ष मंदार रेडे यांनी सांगितले की, महासंघाचा शहर व तालुका स्तरीय विस्तार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा महाजनी यांनी केले तर काव्यसंग्रहाची प्रस्तावना केतकी कुलकर्णी यांनी केली. विकास अभ्यंकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन कमलेश जोशी, राहुल जोशी, वंदना धर्माधिकारी, शैला सोमण, सानिका खरे आणि इतर पदाधिका-यांनी केले. हा काव्यसंग्रह पीडीएफ द्वारे देशाच्या कानाकोप-यात पोहोचवण्यात येणार आहे. जेणेकरुन ऐन नोव्हेंबरमध्ये फुललेला हा फुलोरा जगभरात बहरेल, हे नक्की.