‘वन नेशन, वन इलेक्शन’ यंदा तरी नाही, विजय वडेट्टीवारांचा दावा

मुंबई, १ सप्टेंबर २०२३ : केंद्र सरकारने एक देश एक निवडणूक यासाठी समिती स्थापन केली आहे. त्यामुळे देशभरात येत्या लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रच होणार का? अशी चर्चा सुरू आहे. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

आज पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘एक देश, एक निवडणूक’ यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष आहेत. ही समिती बनली तरी फक्त अहवाल सादर करण्यासाठीच समितीला किमान तीन महिन्यांचा काळ लागेल. तोपर्यंत लोकसभा निवडणुकांची वेळ आलेली असेल. त्यामुळे आगामी निवडणूक तरी ‘एक देश, एक निवडणूक’ याप्रमाणे होणार नाही असे दिसते. इंडिया’च्या तिसऱ्या बैठकीनंतर केंद्रातील सरकार विचलित झालं आहे. ‘एक देश, एक निवडणूक’साठी केंद्र सरकारला बहुमताचा आकडा गाठणं शक्य आहे का? सध्या १२ राज्यातील मुख्यमंत्री विरोधी पक्षांचे आहेत. अशा स्थितीत त्यांच्याशी चर्चा करणं आणि बहुमताचा आकडा गाठणं सरकारला शक्य आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखालील समितीला यावर काम करण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लागेल, तोपर्यंत डिसेंबर महिना उजडेल.

१२ राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय आणि त्या राज्यातील विधानसभेच्या ठरावाशिवाय संविधानात बदल करता येत नाही. असं करायचं असेल तर एक तृतीयांश बहुमत लागतं. तो आकडा भाजपाकडे आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतो. अदाणी प्रकरणावर राहुल गांधींनी जो बॉम्ब टाकला होता, त्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत, अदानी घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच वन नेशन वन इलेक्शनचा मुद्दा आता केंद्र सरकारने पुढे केला आहे. राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे भाजपला जड जात आहे. त्यामुळे लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच केंद्राने हा मुद्दा आणला आहे असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा