मुंबई, २ ऑक्टोबर २०२०: २५ मार्च पासून लाॅक डॉउन घोषित झाल्यानंतर राज्यातील सर्व परिवहन सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळं एसटी’ला मिळणारा महसूल पूर्णपणे थांबला होता. त्यातच या आधीपासूनच एसटी तोट्यात चालली होती. लाॅक डाऊन मुळं झालेल्या नुकसानीची त्यात आणखीन भर पडली. त्यामुळं एसटी’तील चालक, कंडक्टर, डेपोवरील कर्मचारी या सर्वांचेच वेतन प्रलंबित राहिलं होतं. एसटीकडून सरकारकडं देखील मदत करण्याविषयी मागणी केली गेली होती. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय. लवकरच एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचं वेतन दिलं जाईल असं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. मात्र, हे वेतन केवळ एका महिन्याचं दिलं जाणार आहे.
गेल्या साडे पाच महिन्यापासून रखडलेलं एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचं वेतन येत्या गुरुवारी म्हणजे ८ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे. हे वेतन केवळ एक महिन्याचं असंल. मात्र, उर्वरित वेतन देखील लवकरच दिलं जाईल असं अनिल परब यांनी सांगितलं. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली.
एस टी महामंडळ आधीपासूनच तोट्यात चालत होतं. त्यात कोरोनाच्या संकटामुळं आणखीन भर पडली. याबाबत एसटी महामंडळ वारंवार सरकारकडून निधीची मागणी करत होतं. त्यातच एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार देखील कित्येक महिन्यांपासून रखडले होते. या पार्श्वभूमीवर नुकतीच परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पगाराची थकीत रक्कम तात्काळ देण्यात यावी याबाबतची मागणी केली.
“एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांचं वेतन देण्याचं त्यांनी मान्य केलं. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल. उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल,” असं ट्वीट करत अनिल परब यांनी याबाबत माहिती दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे